गोव्याच्या युग प्रभूला यूटीटी नॅशनल रँकिंग स्पर्धेत कांस्यपदक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
26th October 2024, 11:10 pm
गोव्याच्या युग प्रभूला यूटीटी नॅशनल रँकिंग स्पर्धेत कांस्यपदक

पणजी : गोव्याचा प्रतिभावान युवा टेबल टेनिसपटू युग प्रभू याने २५ ऑक्टोबर रोजी नावेली स्टेडियमवर झालेल्या प्रतिष्ठित युटीटी राष्ट्रीय रँकिंग स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात कांस्यपदक पटकावले.
१० वर्षीय युगने प्रभावी कामगिरी करत अंकुश बालिगा (कर्नाटक) याचा ३२ व्या फेरीत ३-० असा, सुभम अधिकारीचा (बंगाल) १६ व्या फेरीत ३-० असा पराभव केला. आणि उपांत्यपूर्व फेरीत निर्वेश सैकिया (आसाम) वर ३-२ अशी मात केली.
अव्वल मानांकित अरिव दत्ता विरुद्ध उपांत्य फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला. अरिवने त्यावर ३-० ने मात केली.
युगने वयाच्या सहाव्या वर्षापासून टेबल टेनिसचे प्रशिक्षण सुरू केले आणि तेव्हापासून तो राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहे. तो बॉईज ११ वर्षांखालील प्रकारात गोव्यात प्रथम क्रमांकावर आणि भारतात ५ व्या क्रमांकावर आहे.
गोवा टेबल टेनिस असोसिएशनचे (जीटीटीए) अध्यक्ष सुदिन वेर्णेकर म्हणाले, आमच्याकडे काही प्रतिभावान युवा खेळाडू आहेत. ज्यांच्याकडे प्रचंड प्रतिभा आणि क्षमता आहे. त्यापैकी काही मुख्य फेरीसाठी पात्र ठरले. युगने यजमान गोव्यासाठी पदक जिंकले, हा आपल्या राज्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. जीटीटीएचे सचिव नीलेश कीर्तनी म्हणाले, युगचा प्रवास आमच्या तरुण खेळाडूंच्या प्रचंड क्षमतेचे प्रतिबिंबित करतो, जेव्हा मार्गदर्शन आणि संधींसह त्यांना प्रोत्साहित केले जाते. युग खूप मेहनत घेत आहे आणि त्याचा विजय खरोखरच कौतुकास पात्र आहे.