कलांगण संस्थेच्या कलारंग महोत्सवाचा शुभारंभ

मडगाव : सुरुवात करणे सोपे असते, पण ती संस्था टिकवणे कठीण असते. हे काम कलांगण संस्थेच्या पदाधिकार्यांनी केले आहे, असे उद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी कलारंग उद्घाटनावेळी काढले. तसेच रवींद्र भवन मडगाव इफ्फीचा उद्घाटन सोहळा (IFFI inaugural ceremony) करण्यासही सज्ज असल्याचे स्पष्ट केले.
कलांगण संस्थेचा २३ वा कलारंग हा पाच दिवसीय उत्सव मडगाव रवींद्र भवनात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मंत्री दिगंबर कामत, कलांगण अध्यक्ष राजीव शिंक्रे, सचिव रंजिता पै, उद्योजिका पल्लवी धेंपो व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्ष राजीव शिंक्रे यांनी संस्थेची वाटचालीचा आढावा घेतला. संस्था केवळ ४० विद्यार्थ्यांसह सुरू झाली होती व आता तिचा वटवृक्ष झाला आहे. विविध कला याठिकाणी शिकवल्या जातात, पालकांनी व विद्यार्थ्यांची मोलाची साथ मिळाल्याचे सांगितले. तसेच कलांगण लवकरच एका मोठ्या प्रांगणात जाणार असल्याचेही स्पष्ट केले. पल्लवी धेंपो यांनी कलांगण संस्थेमुळे विविध कला शिकण्याची संधी मिळत असून हा प्रवास जीवनात आवश्यक असल्याचे म्हटले.
मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले की, मडगावच्या रवींद्र भवनाचे नूतनीकरण झाले असून आता विविध कार्यक्रम सुरू झाले आहे. चित्रपट दाखवण्यासाठी कायमस्वरूपी साधन सुविधा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे इफ्फीचा उद्घाटन सोहळा करण्यासाठी रवींद्र भवन सज्ज आहे. लवकरच बुलबुल बाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले. तर पल्लवी धेंपो यांचे चित्र काढणार्या कलाकार सिया पंडित यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
समाजाचे सहकार्य हाच मोठा सन्मान
कलारंग संस्था २३ वर्षांपूर्वी सुरू झाली. पण, संस्थेचा आतापर्यंतचा प्रवास वाखाणण्याजोगा आहे. सरकारी निधी बंद झाला असतानाही समाजाने या संस्थेला मोठे सहकार्य केले, हेच या संस्थेच्या कामाचे यश आहे. गोव्यात याआधी कधीही न आलेली नाटके या उत्सवात पाहायला मिळतात, हे कलारंगचे वैशिष्ट्य असल्याचे मंत्री कामत यांनी सांगितले.