मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा पहिली रेल्वे निम्मी रिकामी

मडगाव : मुख्यमंत्री (Chief Minister) देवदर्शन यात्रेची यावर्षीची पहिली रेल्वे वालांकिनी या ठिकाणी जाण्यासाठी मडगाव रेल्वेस्थानकावरून (Madgaon Railway station) रवाना झाली. १२०० प्रवाशांची क्षमता असलेल्या या गाडीची योग्य प्रसिध्दी न झाल्याने निम्मे डबे रिकामी राहिले. अचानक नियोजन झाल्याने सर्व जागा भरणे शक्य झाले नसल्याचे कारण समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडून देण्यात आले.
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा या योजनेनुसार २०२६ मधील पहिली रेल्वे मडगाव रेल्वेस्थानकावरुन रवाना झाली. गेल्यावर्षी देवदर्शन यात्रेसाठी एका रेल्वेतून एक हजार भाविकांना जाण्याची सोय होती. मात्र, तेवढ्या जागाही कमी पडत होत्या. त्यामुळे यावर्षी डब्यांमध्ये वाढ करत १२०० प्रवाशांची सोय केली आहे.
मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, ९ जानेवारीला सकाळी निघालेली ही रेल्वे १० रोजी सकाळी वालांकिनी येथे पोहोचेल. त्याठिकाणी चर्चच्या पदाधिकार्यांशी चर्चा झालेली असून भाविकांसाठी विशेष प्रार्थनेची सोय करण्यात आलेली आहे. पाच ते सहा तास भाविक त्याठिकाणी उपस्थित असतील. त्यानंतर रात्री भाविक माघारी निघतील व ११ रोजी गोव्यात परततील. या यात्रेसाठी जेवणाची सोय, राहण्याची सोय व इतर सोयही सरकारकडून करण्यात आलेली आहे. यासाठी भाविकांना एकही रुपया खर्च करण्याची गरज पडणार नाही. पहिल्या रेल्वेत पूर्ण गोव्यातील भाविकांचा समावेश आहे. पण सांताक्रुझ मतदारसंघातील शंभरपेक्षा जास्त भाविक आहेत.
प्रत्येक आमदारांना तीन दिवस आधी गाड्यांची माहिती दिली होती. याशिवाय नोंदणीसाठी विशेष ऑनलाइन पध्दतीची सोय केलेली होती. कोणत्याही वशिल्याशिवाय पोर्टलवर नोंदणी केली जाऊ शकते. देवदर्शन यात्रेची पहिलीच रेल्वे असल्याने अचानक नियोजन ठरल्याने योग्य प्रसिध्दी झाली नसल्याने लोकांना याची माहिती मिळाली नाही. तरीही निम्म्यापेक्षा जास्त डबे भरलेले आहेत, असेही मंत्री फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
अयोध्येसाठी १९ रोजी गाडी
राज्यातील भाविकांकडून अयोध्येत जाण्यासाठी मागणी झालेली आहे. त्यानुसार यावर्षी १९ जानेवारी रोजी अयोध्येला जाण्यासाठी पहिली रेल्वे सोडण्यात येईल. अयोध्या यात्रेसाठी भाविकांच्या प्रतिसादानुसार आणखी डबे जोडण्यात येतील. याशिवाय आणखी कोणत्या धार्मिक स्थळासाठीची निवड यावर्षी अद्याप केलेली नाही. लोकांच्या मागणीनुसार निर्णय होईल, अशी माहिती समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
यावर्षी दहा कोटींची तरतूद
मुख्यमंत्री देवदर्शन यात्रेसाठी यावर्षी राज्य सरकारकडून १० कोटींची तरतूद केलेली आहे. यातील दोन कोटींची रक्कम ही गेल्या वर्षीच्या यात्रेच्या बिलांची बाकी देण्यात येणार आहे. तर यावर्षासाठी आठ कोटींचा खर्च केला जाणार आहे, अशी माहिती मंत्री फळदेसाई यांनी दिली.