‘अर्ज’च्या म्हापशातील ‘विश’ केंद्राची वर्षपूर्ती

वास्कोतील केंद्रामध्ये २५, तर म्हापशात ९ पीडित म​हिला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th January, 11:55 pm
‘अर्ज’च्या म्हापशातील ‘विश’ केंद्राची वर्षपूर्ती

करासवाडा, म्हापसा येथील ‘अर्ज’ संस्थेच्या ‘विश’ केंद्रात तयार करण्यात आलेले टिश्यू पेपर. (उमेश झर्मेकर)

म्हापसा : लैंगिक तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणातून वाचवलेल्या महिलांचे आर्थिक पुनर्वसन व सक्षमीकरण करणाऱ्या ‘अर्ज’ (अन्याय रहित जिंदगी) या स्वयंसेवी संस्थेच्या ‘विश’ केंद्राची नुकतीच एक वर्षपूर्ती झाली आहे. करासवाडा, म्हापसा येथील औद्योगिक वसाहतीत हे केंद्र कार्यरत असून, या केंद्राच्या माध्यमातून ९ महिला आज निराशेतून सन्मानाकडे वाटचाल करत आहेत.

पीडित व शोषित महिलांना कौशल्यविकास, व्यावसायिक प्रशिक्षण तसेच वस्त्रोद्योग, कागद उत्पादन यांसारख्या उद्योगांमधील सामाजिक उद्योजकतेद्वारे शाश्वत उपजीविका आणि सन्मान मिळवून देणे, हे ‘विश’ या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना स्वावलंबी बनवणे आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणे, हाच या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

अर्ज संस्थेसाठी कार्यरत असलेले मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांनी सांगितले की, म्हापसा कदंब बस स्थानकावरून सुटका करण्यात आलेल्या काही पीडित महिला सध्या या केंद्रात कार्यरत आहेत. या नऊ महिला कागद निर्मिती विभागात काम करतात. त्यांच्या हस्ते पेपर बॅग, टॉयलेट पेपर, भरतकाम केलेल्या कापडी पिशव्या आदी उत्पादने तयार केली जातात. या उत्पादनांना चांगली मागणी असून, विविध कॉर्पोरेट कंपन्यांचेही सहकार्य मिळत आहे. या महिलांना दरमहा १५ हजार रुपये मानधनासह ईएसआय व पीएफसारख्या सुविधा दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. पाटकर यांनी पुढे सांगितले की, अनेकदा या पीडितांच्या कमाईवर इतर लोक ऐषआराम करतात. मात्र, ‘अर्ज’ संस्था अशा महिलांना या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात पुढे करते. कोणतीही महिला स्वेच्छेने मानवी तस्करी किंवा वेश्याव्यवसायात येत नाही. परिस्थिती किंवा वेळ त्यांच्यावर तसे लादते. अनेक वेळा त्यांचे नवरे किंवा जोडीदारच त्यांना या व्यवसायात ढकलतात, हे वास्तव आहे.

सध्या उत्तर गोव्यातील म्हापसा कदंब बस स्थानक परिसरात काही मागासवर्गीय महिला वेश्याव्यवसाय करत असल्याचे चित्र आहे. स्थानिक नगरपालिका, प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी आणि पोलीस यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास या तस्करीवर आळा घालता येऊ शकतो. हे मानवी तस्करीचे मोठे जाळे असून, त्याचा नायनाट करण्यासाठी लैंगिक सेवा खरेदी करणारे तसेच अशा प्रकारांसाठी जागा उपलब्ध करून देणारे हॉटेल व्यावसायिक यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मतही डॉ. पाटकर यांनी व्यक्त केले.

अनेक महिलांना शोषणाच्या दलदलीतून वाचवले

‘विश’ उपक्रमाच्या माध्यमातून ‘अर्ज’ संस्था पीडित महिलांच्या पुनर्वसनावर भर देत त्यांना आर्थिक उपजीविका उपलब्ध करून देत आहे. आतापर्यंत संस्थेने अनेक कुटुंबांमधील दुसऱ्या पिढीला या शोषणाच्या दलदलीत जाण्यापासून वाचवले आहे. सध्या म्हापसा आणि वास्को येथे ‘विश’ची केंद्रे कार्यरत असून, वास्को येथे २५ तर म्हापसा येथे ९ महिला या केंद्रांमध्ये काम करत असल्याची माहिती ‘अर्ज’ संस्थेच्या फुलियाना लोहार यांनी दिली.


हेही वाचा