
मडगाव: कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. २०२५ या संपूर्ण वर्षात राबवण्यात आलेल्या सखोल तिकीट तपासणी मोहिमांमधून रेल्वेने एकूण २०.२७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि सुखकर व्हावा, या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ८,४८१ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. यामध्ये विनातिकीट आणि अनियमित प्रवास केल्याची तब्बल ३,६८,९०१ प्रकरणे उघडकीस आली. या सर्व प्रवाशांकडून रेल्वे भाडे आणि दंडापोटी २०.२७ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. केवळ डिसेंबर २०२५ या एका महिन्यातच ९९८ मोहिमांद्वारे ४३,८९६ विनातिकीट प्रवाशांकडून २.४५ कोटी रुपये वसूल करण्यात आले.
रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि रेल्वे अधिकारी यांच्या संयुक्त समन्वयाने ही मोहीम गाड्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर सातत्याने राबवली जात आहे. भविष्यातही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहणार असून, प्रवाशांनी दंड आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.