‘बर्च’चा ऑपरेटर मॅनेजर बिजय सिंगला अटक

हणजूण पोलिसांनी झारखंडमध्ये आवळल्या मुसक्या


09th January, 11:54 pm
‘बर्च’चा ऑपरेटर मॅनेजर बिजय सिंगला अटक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : साकवाडी, हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन अग्नितांडव प्रकरणी क्लबचा ऑपरेटर मॅनेजर बिजय कुमार सिंग (रा. झारखंड) याला हणजूण पोलिसांनी झारखंडमधून अटक केली. या दुर्घटनेनंतर संशयित आपल्या मूळ गावी पसार झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
ही भीषण आग दुर्घटना ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री घडली होती. या अग्नितांडवमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला होता, तर सहाजण जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच पर्यटक आणि २० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. याप्रकरणी पोलिसांनी क्लबचे सरव्यवस्थापक विवेक चंद्रभान सिंग (उत्तर प्रदेश), गेट मॅनेजर प्रियांशू कृष्णकुमार ठाकूर (दिल्ली), बार मॅनेजर राजवीर रूद्रनाथ सिंघानिया (उत्तर प्रदेश), मुख्य सरव्यवस्थापक राजीव कुमार मोडक (दिल्ली), गोवा प्रमुख भरत सिंग कोहली (दिल्ली) यांच्यासह मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा व अजय गुप्ता (सर्व रा. दिल्ली) या आठ जणांना अटक केली होती. यातील संशयित प्रियांशू ठाकूर व राजवीर सिंघानिया यांना जामीन मिळाला आहे.
दुर्घटना घडल्यानंतर संशयित बिजय सिंगने गोव्यातून पलायन केले होते. हा प्रकार समोर आल्यावर गोवा पोलिसांनी संशयिताला पकडून आणण्यासाठी हणजूण पोलिसांचे पथक झारखंड येथे पाठवले होते. संशयिताला अटक करून हे पथक शुक्रवार, ९ जानेवारी रोजी गोव्यात दाखल झाले. पोलिसांनी संशयिताला दुर्घटना प्रकरणी रितसर अटक केली. पोलिसांनी भा.न्या.सं.च्या १०५, १२५, १२५ (अ), १२५ (ब), २८७ व ३(५) कलमान्वये याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज गावस करत आहेत.
सरव्यवस्थापकांच्या जामीन अर्जात बिजय सिंगचा उल्लेख
दरम्यान, संशयित सरव्यवस्थापक विवेक सिंग यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जात ऑपरेशनल मॅनेजर बिजय कुमार सिंग याच्या नावाचा उल्लेख केला आहे. दुर्घटनेतील क्लबचे दैंनंदिन व्यवहार बिजय कुमार सिंग आणि असोसिएट उपाध्यक्ष सर्व्हिस हे पहात असल्याचे अर्जात नमूद केले होते.