ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी राज्य कृती दल स्थापन

दलाचे पोलीस महानिरीक्षक अध्यक्ष : तस्करांविरुद्ध विशेष मोहिमांची योजना आखणार


09th January, 10:06 pm
ड्रग्ज तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी राज्य कृती दल स्थापन

कृती दलाचे एआयनिर्मित चित्र.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील अमलीपदार्थ विरोधातील व्यवस्था अधिक मजबूत करणे, राज्यातील अमलीपदार्थ विक्रीवर प्रतिबंध घालणे, विविध भागधारकांमधील समन्वय सुधारण्यासाठी अमलीपदार्थ विरोधी राज्य कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. कृती दल पोलीस महासंचालकांच्या देखरेखीखाली व पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे. यामध्ये उत्तर गोवा, दक्षिण गोवा, कुशावती जिल्हा एएनसी, एटीसी गुन्हे शाखा, कोकण रेल्वे, किनारी पोलीस अधीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.
अमलीपदार्थांच्या तस्करीविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, अमलीपदार्थांचे उत्पादन, विक्री, पुरवठा आणि वितरण यामध्ये सामील असलेल्या सर्वांवर कारवाई करणे व फौजदारी खटले चालवणे, याच्या धोक्याविरुद्धच्या मोहिमेमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबवणे आणि लोकांचा सहभाग सुनिश्चित करणे अशी कामे कृती दल करणार आहे. तसेच याबाबत इतर राज्ये आणि केंद्र सरकारसोबत समन्वय साधण्याचे कामही कृती दल करणार आहे.
कृती दल राज्यासाठी नार्को समन्वय केंद्र म्हणून कार्य करेल. कृती दल अमलीपदार्थ नियंत्रण योजना, राष्ट्रीय निधी, अवैध लागवडीच्या निर्मूलन मोहिमांचे समन्वय इत्यादी राज्य नोडल म्हणून काम करतील. तसेच तांत्रिक गुप्त माहिती गोळा करणे, पाळत ठेवणे, तस्करांविरुद्ध विशेष मोहिमांची योजना आखणे, त्यांची अंमलबजावणी करणे आदी कामे करणार आहे. दल स्वतंत्रपणे किंवा स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने गुन्हे दाखल करेल आणि तपास करेल.
कृती दल अमलीपदार्थांच्या गुन्ह्यांशी संबंधित कोणत्याही प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून हस्तांतरित करण्यासाठी, आपल्या ताब्यात घेण्यासाठी पोलीस महासंचालक, राज्य पोलीस यांच्याकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करू शकते. राज्यातील मोठे विक्रेते आणि वितरकांना अटक करणे, माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर करून डार्क वेब, सोशल मीडिया, क्रिप्टोकरन्सी इत्यादींच्या माध्यमातून अमलीपदार्थांच्या अवैध व्यापारात सामील असलेल्यांविरुद्ध कारवाई करण्याचे काम कृती दल करणार आहे.
कृती दलाचे कार्य
अमलीपदार्थांशी संबंधित डेटाचे विश्लेषण करणे व आवश्यक धोरणात्मक बदलांसाठी सरकारला शिफारसी करणे.
एनडीपीएसशी संबंधित सर्व बाबींमध्ये शेजारील राज्यांशी वेळोवेळी सल्लामसलत करणे.
कृती दलाला गोवा पोलिसांकडून मनुष्यबळ, साहित्य आणि यंत्रसामग्रीसह विशेष उपकरणे पुरवली जातील.
कृती दलाला आपल्या कामाचा मासिक अहवाल पोलीस महासंचालकांना सादर करावा लागेल.