गुगल ट्रेंडची आकडेवारी : स्टाफ सिलेक्शन कमिशनसह गोल्ड रेटलाही मोठी पसंती

पणजी : ‘गुगल’ या सर्च इंजिनने २०२५ सालातील गोव्याच्या सर्च ट्रेंडची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये सरकारी नोकरीच्या ओढीमुळे ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ आणि ‘एसएससी’ या शब्दांचा बोलबाला राहिला. यासोबतच गोवेकरांनी ‘मटका’, ‘बेकरी’, ‘गोल्ड रेट’ आणि खाद्यपदार्थांच्या रेसिपींना पसंती दिल्याचे समोर आले.
राज्य सरकारने सरकारी पदांच्या भरतीसाठी कर्मचारी निवड आयोगाची स्थापना केल्यामुळे २०२५ मध्ये गोव्यातून शिक्षण विभागात ‘एसएससी’ आणि ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ हे शब्द प्रामुख्याने शोधले गेले. याची बहुतेक प्रक्रिया ऑनलाईन असल्याने तरुणांचा कल याकडे अधिक दिसून आला. यासोबतच घरगुती स्तरावर ‘मोदक रेसिपी’ आणि ‘पिकल’ (लोणचे) अशा शब्दांचाही शोध घेण्यात आला.
| श्रेणी (Category) | सर्वाधिक शोधलेले शब्द |
|---|---|
| अर्थ (Finance) | गोल्ड रेट, नेट बँकिंग, एसबीआय, इन्कम टॅक्स, निफ्टी |
| आरोग्य (Health) | डॉक्टर, डायबेटिस, लिव्हर, सनस्क्रीन, सिम्प्टम |
| अन्न आणि पेय | केक, वाईन, प्रॉन्झ, पिझ्झा, बिर्याणी, मोदक रेसिपी |
| ऑटो (Auto) | प्राईज, कार, टाटा, मारुती, बीएमडब्ल्यू |
| गोवा अव्वल | मटका, बेकरी |
वित्त विभागात (फायनान्स) गोल्ड रेट, नेट बँकिंग आणि निफ्टी या शब्दांना पसंती मिळाली. तर आरोग्य विभागात ‘डॉक्टर’ हा शब्द सर्वाधिक शोधला गेला. २०२५ मध्ये देशभरात आयपीएल, आशिया कप आणि महाकुंभमेळा हे शब्द ट्रेन्डिंग होते, हे शब्द शोधण्यात गोवा देशपातळीवर पहिल्या १० राज्यांमध्ये राहिला आहे.
अन्न आणि पेय विभागात केक, वाईन आणि बिर्याणी हे शब्द ट्रेन्डिंग राहिले. तंत्रज्ञान क्षेत्रात पीडीएफ टू वर्ड, एक्सेल, लॅपटॉप आणि व्हॉट्सअॅप या शब्दांचा शोध घेण्यात आला. विशेष म्हणजे, गुगल ट्रेंडनुसार ‘बेकरी’ आणि ‘मटका’ हे शब्द सर्च करण्यात गोवा राज्य संपूर्ण देशात अव्वल ठरले आहे.
व्यवसाय विभागात आयआरसीटीसी, पीएनआर स्टेटस आणि विशेषतः ‘गोवा इलेक्ट्रिसिटी’ व ‘इलेक्ट्रिसिटी बिल’ या शब्दांचा भरणा होता. यावरून गोवेकर डिजिटल सेवांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचे दिसून येते. याशिवाय हवामानाची (वेदर) माहिती घेण्यासाठीही गुगलचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला.