पीडब्ल्यूडीचे अभियंते मंत्र्यांचेही एेकेनात : मंत्री खंवटे

दोन-तीन दिवसांत रस्त्यांच्या दुरुस्तीचे मंत्री कामतांचे आश्वासन


08th January, 12:05 am
पीडब्ल्यूडीचे अभियंते मंत्र्यांचेही एेकेनात : मंत्री खंवटे

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्याचे (पीडब्ल्यूडी) अभियंते मंत्र्यांचेही ऐकत नाहीत. त्यामुळे मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही ठरल्या वेळेत कामे होत नाहीत, असे पर्यटनमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे म्हणाले. पर्वरीचे रस्ते दोन दिवसांत हॉटमिक्सिंग झाले नाहीत तर आंदोलनाचा इशाराही मंत्री खंवटे यांनी दिला.
पर्वरी येथे उड्डाण पुलाचे काम वेगात सुरू आहे. उड्डाण पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी लागते. वाहतूक वळवण्यापूर्वी सर्व्हिस रोड हॉटमिक्स करण्यासह ते चांगले करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी चार महिन्यांपूर्वी दिले होते. आजपावेतो रस्त्यांचे हॉटमिक्सिंग झालेले नाही. रस्त्यांची दुरुस्ती दोन दिवसांत झाली नाही तर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. अभियंते आणि कंत्राटदार मंत्र्यांच्या आदेशाचे पालन करत नाहीत, ही गंभीर गोष्ट आहे. उड्डाण पुलाच्या कामासाठी कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम खात्याला पर्वरीच्या लोकांनी सहकार्य केले आहे. रस्ते चांगले नसल्याने वाहन चालवणे कठीण होते, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.


तांत्रिक कारणामुळे रस्त्याच्या कामांना विलंब : दिगंबर कामत
रस्ते हॉटमिक्स व दुरुस्त करण्यासाठी बेंच मिक्स प्लान्ट सुरू व्हावा लागतो. प्लान्ट अद्याप सुरू झालेला नाही. ड्रम मिक्स प्लान्टच्या मदतीने रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. तांत्रिक कारणामुळे रस्ते दुरुस्त करण्याला विलंब होत आहे. दोन ते तीन दिवसांत रस्ते हॉटमिक्स केले जातील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री मंत्री दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले.