संशयिताला घेतले ताब्यात : बागा येथे ३१ डिसेंबरला घडला होता प्रकार

म्हापसा : बागा समुद्रकिनाऱ्यावर एका पर्यटक महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी संशयित आरोपी सुनील बाबू पवार (२९, रा. चंदननगर झोपडपट्टी, चेंबूर मुंबई, मूळ नांदेड महाराष्ट्र) याला मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा गुन्हा ३ वर्षांखालील शिक्षापात्र असल्याने पोलिसांनी संशयिताला अटक केली नाही.
हा विनयभंगाचा प्रकार ३१ डिसेंबर २०२५ रोजी मध्यारात्री घडला होता. बागा समुद्रकिनारी खुल्या जागी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ ४ जानेवारी रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पर्यटन खात्याने याची दखल घेत खात्याचे संचालक केदार नाईक यांनी ५ जानेवारी रोजी कळंगुट पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
अज्ञात व्यक्तीने समुद्रकिनाऱ्यावर एका महिला पर्यटकासोबत अश्लील हावभाव करून तिचा विनयभंग केला. संशयित गुन्हेगाराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५ व ७९ आणि इतर कायद्यांच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती तक्रारीत करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात संशयित आरोपीविरुद्ध वरील कलमान्वये गुन्हा नोंदविला होता.
पोलीस चौकशीत संशयित आरोपी हा मुंबईतील पर्यटक असल्याचे उघडकीस आले होते. त्यानुसार, तांत्रिक यंत्रणांच्या आधारे पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली. तो चेंबूर मुंबई येथील इंडियन ऑईल, चंदननगर झोपडपट्टी येथील रहिवासी असल्याचे असल्याचे आढळून आले. कळंगुट पोलिसांनी तत्काळ मुंबईमध्ये जाऊन संशयिताला पकडून ताब्यात घेतले. गुरुवार, दि. ८ रोजी त्याला गोव्यात आणले.
पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिनेश कानोळकर, कॉ. स्मितल बांदेकर, गौरेश कारबोटकर, राज परब, अंशुल घाडी या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नाईक हे करीत आहेत.
महिलेची ओळख पटविण्यास अपयश
या प्रकरणातील पीडित महिलेची पोलिसांना अद्याप ओळख पटवण्यात यश आले नाही किंवा सदर महिलेने पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रत्न केला नाही. त्यामुळे पीडित महिला कोणत्या प्रदेशातील आहे, हे उघडकीस आले नाही. संशयित आरोपी आपल्या झोपडपट्टीतील ९ मित्रांसमवेत नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटनासाठी आला होता. त्यावेळी त्याच्याकडून हा गुन्हेगारी प्रकार घडला.