राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

पणजी : संपूर्ण देशासोबतच आता गोव्यातही जनगणनेची प्रक्रिया (Census process in Goa) सुरू होणार आहे. या महत्त्वपूर्ण कार्यासाठी राज्य सरकारने अधिकृत अधिसूचना जारी केली असून, त्या-त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आता प्रधान जनगणना अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासोबतच जिल्हा आणि उपविभाग स्तरावरील इतर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही निश्चित करण्यात आल्या आहेत.
अधिसूचनेनुसार, जिल्ह्यांच्या स्तरावर अधिकार प्रदान करण्यात आले असून उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपापल्या जिल्ह्यांचे प्रधान जनगणना अधिकारी असतील. प्रत्येक जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी हे जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून काम पाहतील. त्याशिवाय प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर अतिरिक्त जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शहरनिहाय अधिकारी नियुक्ती
शहरी आणि उपविभागीय क्षेत्रांसाठी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून पणजीचे उपजिल्हाधिकारी आणि एसडीओ हे पणजी उपविभाग व शहर क्षेत्रातील जनगणनेचे मुख्य अधिकारी असतील. मडगाव शहर आणि उपविभागाची जबाबदारी मडगावच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. तर मुरगाव शहराचे आणि संबंधित उपविभागाचे जनगणना कामकाज मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालेल.
तालुका स्तरावरील नियंत्रण
बार्देश, डिचोली, पेडणे, सत्तरी, तिसवाडी, फोंडा, धारबांदोडा, सांगे, केपे, सासष्टी, मुरगाव आणि काणकोण या तालुक्यांचा ताबा संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. तसेच, प्रत्येक तालुक्याचे जोड मामलेदार हे अतिरिक्त जनगणना अधिकारी म्हणून कार्यभार पाहतील. या नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना जनगणनेच्या घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्याचे कायदेशीर अधिकार देण्यात आले आहेत.