चोडण पुलाचा मार्ग मोकळा! २७४.८३ कोटींची निविदा जारी

ऑनलाईन बोली; ३ वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याची अट.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
09th January, 06:02 pm
चोडण पुलाचा मार्ग मोकळा! २७४.८३ कोटींची निविदा जारी

पणजी: कामानिमित पणजीत ये-जा करणाऱ्या चोडण, मये आणि डिचोली परिसरातील हजारो नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने (GSIDC) चोडण ते साल्वादोर द मुंद या पुलासाठी २७४.८३ कोटी रुपयांची निविदा गुरुवारी जारी केली आहे. इच्छुक कंत्राटदारांकडून ऑनलाइन स्वरूपात बोली मागवण्यात आल्या असून, कंत्राट मिळाल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

या पुलासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही, कारण काही जमिनींचे मूळ मालक शोधण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र, स्थानिकांची निकड लक्षात घेऊन सरकारने निविदा प्रक्रियेला गती दिली आहे. मयेचे आमदार प्रेमेंद शेट यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून विधानसभेतही यावर अनेकदा चर्चा झाली आहे. सध्या चोडण-रायबंदर फेरी मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते, त्यात 'रो-रो' फेरी सुरू करूनही वाढत्या वाहतुकीचा ताण कमी झालेला नाही. त्यामुळे या पुलाची गरज अधिकच स्पष्ट झाली होती.

सुमारे २०० मीटर लांबीच्या या पुलासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पुलाचे मुख्य बांधकाम साधनसुविधा महामंडळ करणार असून, जोड रस्त्यांचे काम सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केले जाणार आहे. साल्वादोर द मुंद आणि बेती येथील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रियेची आवश्यकता भासणार आहे. भूसंपादनामुळे रखडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकारने समन्वय समितीची स्थापना केली होती. जमिनींच्या नुकसान भरपाईसाठी १२.५ कोटी रुपये आधीच जमा करण्यात आले असून, आता निविदा जारी झाल्याने प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी आशा नागरिकांना वाटत आहे.

हेही वाचा