एसटी विद्यार्थ्यांना दिलासा : आधार कार्ड नसल्यास पर्यायी कागदपत्रे धरणार ग्राह्य

पणजी : गोव्यातील अनुसूचित जमातीतील (ST) विद्यार्थ्यांच्या इंजिनिअरिंग (JEE) आणि मेडिकल (NEET) परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना ३ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. ही मदत इयत्ता ११ वी आणि १२ वी अशा दोन वर्षांच्या कोचिंगसाठी दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही, त्यांना योजनेपासून वंचित राहावे लागू नये म्हणून सरकारने कागदपत्रांमध्ये मोठी सवलत दिली आहे.
१८ वर्षांखालील विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल, तर त्याने आधार नोंदणीसाठी केलेल्या अर्जाची पावती सादर करावी. ती उपलब्ध नसल्यास जन्म दाखलो, पासपोर्ट किंवा १० वीची गुणपत्रिका यांपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, जातीचा दाखलो, रहिवासी दाखला, विमा कार्ड किंवा वाहन परवाना यांपैकी एक पुरावा सादर करता येईल.
‘एकलव्य’साठी फीमध्ये ७५ टक्के सवलत
या योजनेसोबतच 'एकलव्य प्रशिक्षण योजने' अंतर्गत १० वी, ११ वी आणि १२ वीच्या एसटी विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासच्या एकूण शुल्कापैकी ७५ टक्के रक्कम सरकारकडून दिली जाणार आहे. या योजनेसाठीदेखील आधार कार्ड नसेल तर वरीलप्रमाणे पर्यायी कागदपत्रे सादर करण्याची मुभा अधिसूचनेत देण्यात आली आहे. सरकारने यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे, त्यांनी ते अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. मात्र, ज्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही, त्यांना नोंदणी पावतीच्या आधारे लाभ दिला जाईल. यामुळे ग्रामीण भागातील गुणवंतांना मोठा आधार मिळणार आहे.