उंदराने देव्हाऱ्यातील वात पळविल्याने ‘घरान’ भस्मसात

आगीत ४५ लाखांचे नुकसान : खोर्लीतील घर, कळंगुटमधील हॉटेलचे गोदाम खाक


07th January, 12:21 am
उंदराने देव्हाऱ्यातील वात पळविल्याने ‘घरान’ भस्मसात

भीषण आगीत भस्मसात झालेले पर्वरी येथील ‘घरान’ रेस्टॉरंट.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : बार्देश तालुक्यात मंगळवारी आग लागण्याच्या तीन दुर्घटना घडल्या. पर्वरीतील ‘घरान’ रेस्टॉरंट भीषण आगीत भस्मसात झाले. नायकावाडा, कळंगुट येथील बांधकाम सुरू असलेल्या ‘सागा’ हॉटेलचा गोदाम आणि खोर्ली म्हापसा येथील प्रमोद कर्पे यांच्या घरातील साहित्य आगीत जळाले. तिन्ही दुर्घटनांमध्ये अंदाजे ५५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. उंदराने देव्हाऱ्यातील जळती वात पळविल्याने ‘घरान’ रेस्टॉरंटची दुर्घटना घडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आले आहे.
मंगळवारी पहाटे ४.२८ च्या सुमारास ‘घरान’ रेस्टॉरंटला आग लागली. पर्वरी, पणजी आणि पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण रेस्टॉरंट भस्मसात झाले होते. लाक व माडाची झावळे वापरून या रेस्टॉरंटचे इको फ्रेण्डली बांधकाम केले होते. त्यामुळे आगीने लगेच पेट घेतला. प्रसंगावधान राखून अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्टॉरंटच्या आवारातील ११ गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले नाही. सुदैवाने दुर्घटनेवेळी रेस्टॉरंटमध्ये कर्मचारी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.


आगीची दुसरी घटना नायकावाडा, कळंगुट येथे सकाळी ६.५० च्या सुमारास घडली. ‘सागा’ नामक एका सहा मजली हॉटेलच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या गोदामाला आग लागली. शार्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. या आगीत गोदाममधील साहित्य खाक झाले. यामध्ये पेंट, लाकडी व इतर वस्तूंचा समावेश असून अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही गोदाम खोली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होती. पिळर्ण, म्हापसा व पर्वरी अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग नियंत्रणात आणली.


आगीची तिसरी घटना तेलंगनगर, खोर्ली- म्हापसा येथे सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. प्रमोद कर्पे यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. यावेळी घराच्या खालच्या मजल्यावर कर्पे कुटुंबीय होते. घराच्या छतावरून धूर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी कर्पे कुटुंबियांना कल्पना दिली. कुटुंबियांनी टाकीतील पाण्याचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. नंतर म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. या दुर्घटनेत अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.
‘घरान’ची आग घातपात नाही, तर अपघात
पर्वरी येथील ‘घरान’ रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत घातपाताचा संशय मालक पद्मजा नाईक मिरसानकर व यश हळदणकर यांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी दुर्घटनेतून वाचलेल्या सीसीटीव्ही डीव्हीआरमधील फुटेजची पडताळणी केली. तेव्हा रेस्टॉरंटमधील देवघरात तेलाचा दिवा पेटत होता. पेटती वात उंदराने पाडली व ती ओढत नेली. यामुळे देवघराला प्रथम आग लागली आणि भडकली. त्यानंतर विजेच्या बॉक्सने पेट घेतला आणि नंतर सीसीटीव्ही बंद पडल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. त्यानुसार ही दुर्घटना घातपात नसून केवळ अपघात असल्याचे उघड झाले.