सात जण गंभीर जखमी : कारखाना परिसरात तणावाचे वातावरण

बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात बुधवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून, कारखाना परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे.
विक्रम इनामदार यांच्या मालकीच्या या प्रकल्पात दुपारी २ वाजता ही दुर्घटना घडली. काम सुरू असताना अचानक झालेल्या स्फोटामुळे उकळते रसायन अंगावर पडल्याने कामगार भीषणरित्या होरपळले. या आवाजाने परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.
बैलहोंगल तालुक्यातील मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली. कारखान्याच्या नंबर १ कंपार्टमेंटमध्ये वॉल रिपेअरचे काम सुरू असताना अचानक बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात बॉयलरमधील उकळलेली मळी कामगारांच्या अंगावर पडली.
या दुर्घटनेत आठ कामगार गंभीर भाजले गेले. त्यापैकी अक्षय तोपडे, दीपक मन्नोळी आणि सुदर्शन या तीन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित पाच जखमींवर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागाने तत्काळ हालचाली केल्या. पोलिसांनी झिरो ट्रॅफिक करून जखमी कामगारांना तातडीने केएलई रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे वेळीच उपचार मिळू शकले.
दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. प्रारंभिक तपासात काम सुरू असताना सुरक्षा उपायांतील त्रुटीमुळे ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जखमी कामगारांमध्ये मंजुनाथ तेरदाळ, राघवेंद्र गिरीयाळ, गुरु तम्मण्णवर, भरत सारवाडी आणि मंजुनाथ काजगार यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कारखान्यातील सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास मुरगोड पोलीस करीत आहेत.