ट्यूशनवरून घरी जाताना घडला प्रकार

म्हापसा : ट्यूशनवरून घरी जाणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला लिफ्ट देत त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी मॅथ्यू आल्मेदा (३४, रा. बस्तोडा, बार्देश) याला अटक केली आहे.
ही घटना बुधवार, ७ जानेवारी रोजी रात्री १० ते ११ वा. दरम्यान म्हापसा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. मुलगा नेहमीप्रमाणे ट्यूशनवरून चालत घरी जात होता. यावेळी दुचाकीस्वाराने त्याला लिफ्ट देत त्याचे अपहरण केले.
एका निर्जनस्थळी दुचाकी थांबून संशयिताने मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. पीडित मुलाने संशयिताच्या तावडीतून कशीबशी स्वत:ची सुटका केली आणि घरी धाव घेतली. घरी आल्यावर हा प्रकार त्याने पालकांना सांगितला. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी म्हापसा पोलीस स्थानकात अज्ञात संशयिताविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी संशयिताचा शोध घेत गुरुवारी सकाळी त्याला पकडून ताब्यात घेतले. भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२), ७५ (२) व गोवा बाल कायदा कलम ८ व ८(२) आणि पोक्सो कायदा कलम ८ व १२ आणि बाल न्याय संरक्षण कायदा कलम ७५ व ८४ अन्वये गुन्हा नोंदवून संशयिताला अटक केली.
दरम्यान, म्हापसा न्यायालयाने संशयिताला ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नवीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य गाड हे करीत आहेत.