
पणजी : समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणातील मुख्य संशयित आणि सराईत गुन्हेगार जेनिटो कार्दोज याला मेरशी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. या आदेशाला पीडित रामा काणकोणकर यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी बुधवार, ७ रोजी होणार आहे.
करंझाळे येथे १८ सप्टेंबर रोजी रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पणजी पोलिसांनी मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोज याच्यासह अँथनी नदार, फ्रान्सिस नदार, मिंगेल आरावजो, मनीष हडफडकर, सुरेश नाईक, फ्रांको डिकॉस्टा व साईराज गोवेकर या आठ जणांना अटक केली होती.
संशयित मिंगेल आरावजो हा आपला पाठलाग करत होता. मारहाण करताना हल्लेखोरांनी आपल्याला ‘गावडा’ आणि ‘राखणदार’ म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला’, असा जबाब रामा काणकोणकर यांनी पोलिसांना दिला. त्यानुसार, पोलिसांनी या गुन्ह्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (छळ प्रतिबंध) कायद्याअंतर्गत कलम जोडून हे प्रकरण पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे चौकशीसाठी सोपवले होते. याच दरम्यान सराईत गुंड जेनिटो कार्दोज याने मेरशी येथील सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याची दखल घेऊन जेनिटो याने न्यायालयात पुन्हा जामीन अर्ज दाखल केला. दरम्यान जेनिटो याला मेरशी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. या आदेशाला रामा काणकोणकर यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.