द्विभार्याविवाह करून वेरेतील महिलेची मुंबईतील भामट्याकडून फसवणूक

पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध साळगाव पोलिसांत गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th January, 12:19 am
द्विभार्याविवाह करून वेरेतील महिलेची मुंबईतील भामट्याकडून फसवणूक

म्हापसा : वेरे रेईश मागूश येथील याशिका योगेश सावंत हिच्याशी द्विभार्याविवाह करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली साळगाव पोलिसांनी फिर्यादी महिलेचा पती योगेश सावंत उर्फ देवेंद्र भोसले (रा. सध्या मुंबई) आणि सासू सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ९ नोव्हेंबर २००९ ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संशयित योगेश सावंत उर्फ देवेंद्र भोसले याने लग्नापूर्वी आपली दोन लग्ने झाल्याची माहिती तसेच बलात्काराच्या गुन्ह्याची बाब जाणीवपूर्वक लपवून तक्रारदार महिलेशी विवाह केला. लग्नानंतरही त्याने आपले विवाहबाह्य संबंध सुरू ठेवले आणि कायदेशीर घटस्फोट न घेता पुन्हा पुन्हा लग्ने करून पत्नीची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

तसेच संशयित व त्याच्या कुटुंबीयांनी फिर्यादी महिलेचा मानसिक छळ, भावनिक अत्याचार, शाब्दिक अपमान, मानहानी आणि हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्यामुळे तिला तीव्र मानसिक तणाव, भीती आणि भावनिक धक्का बसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे तिच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ८२(१), ८५, ३१८ व ३(५) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. संशयित आरोपी सध्या देशाबाहेर असून, भारतात परतल्यानंतर चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना पोलिसांनी त्याला दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अक्षय फातर्पेकर करीत आहेत.

दरम्यान, संशयित आरोपीचे या लग्नापूर्वीच दोन विवाह झाले होते. तसेच २००९ मध्ये एका महिलेच्या तक्रारीवरून त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही झाली होती.

मॅट्रिमोनी संकेतस्थळावरून ओळख

तक्रारीनुसार, २००९ साली फिर्यादी याशिका सावंत यांची मॅट्रिमोनी संकेतस्थळावरून योगेश सावंत याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाह केला. मात्र त्या वेळी उपनिबंधक कार्यालयात विवाहाची कायदेशीर नोंदणी करण्यात आली नव्हती. फिर्यादीच्या आग्रहामुळे २०१३ मध्ये विवाह नोंदणी करण्यात आली.

२०१४ मध्ये तिसरे लग्न, नंतर आणखी दोन विवाह

संशयित आरोपीने २०१४ मध्ये तिसरे लग्न केले आणि फिर्यादी पत्नी व लहान मुलीला सोडून तो गोव्यातून मुंबईला गेला. त्यानंतर मुंबईत त्याने आणखी दोन महिलांशी विवाह केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सध्या तो देवेंद्र भोसले या नावाने मुंबईत वास्तव्यास असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.

हेही वाचा