सील केलेल्या क्लबपैकी तीन क्लब पुन्हा खुले केल्यामुळे आश्चर्य

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
07th January, 12:12 am
सील केलेल्या क्लबपैकी तीन क्लब पुन्हा खुले केल्यामुळे आश्चर्य

म्हापसा : साकवाडी, हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्नितांडवानंतर राज्य प्रशासनाने अंमलबजावणी पथकाकडून हणजूण-वागातोरमधील सील केलेल्या सहा क्लबपैकी तीन क्लब पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.

अग्निशमन दलाच्या एनओसीविना क्लब सुरू ठेऊन अग्नी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली सरकार नियुक्त संयुक्त अंमलबजावणी व देखरेख समितीने सालुद, मायान बीच क्लब, दियाझ, कॅफे सीओ-२, गोया, क्लारा हे क्लब सील केले होते. मात्र, गेल्या डिसेंबर महिन्याच्या शेवटी सहापैकी चार क्लबचे सील हटविण्यात आले. नंतर एक दोन दिवसांनी सालूद या क्लबला पुन्हा सील ठोकण्यात आले.

सध्या सहापैकी तीन क्लबचे सील हटविण्यात आले असून त्यात दियाझ, सीओ-२, मायान या क्लबचा समावेश आहे. उर्वरित क्लब बंद आहेत. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर वरील क्लब खुले केल्याने नाईट क्लबवर प्रशासनाने सील ठोकण्याची केलेली कारवाई केवळ देखावा होता, असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.

दरम्यान, बर्च दुर्घटनेनंतरही यंदा डिसेंबर महिन्याच्या शेवटी राज्यातील किनारी भागात नवीन नाईट क्लब सुरू झाले आहेत. यामध्ये वझरात, वागातोर येथील धी लीला गोवा आणि हॅमरझ मॅकारेना या नाईट क्लबचा समावेश आहे.

हेही वाचा