थिवी, मयडेत दोन वृद्ध महिलांचा बुडून मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th January, 11:25 pm
थिवी, मयडेत दोन वृद्ध महिलांचा बुडून मृत्यू

म्हापसा : थिवी व मयडे येथे नदीच्या पात्रात बुडून दोघा वृद्ध महिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोलवाळ व म्हापसा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून घटनांची नोंद केली असून दोन्ही मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉमध्ये पाठवून दिले आहेत.

कोलवाळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माडेल थिवी येथील बीबीजान उडीकेरी (७०) हिचा मृतदेह थिवी नदीच्या पात्रात सापडला. ती महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. रविवार, ४ रोजी सकाळी थिवी येथील नदीकिनारी महिलेचे चप्पल आढळून आले. नंतर तिचा अग्निशमन दलाच्या मदतीने स्थानिकांनी शोध घेतला असता तिचा मृतदेह नदीच्या पात्रात आढळून आला. हल्लीच झालेल्या आपल्या नातवाच्या मृत्यूमुळे त्या नैराश्यात होत्या. घटनेचा पंचनामा कोलवाळ पोेलिसांनी केला.

दरम्यान, दुसरी घटना मयडे येथे घडली. म्हापसा नदीवरील मयडे पुलावरून उडी घेतल्याने जखमी झालेल्या लता जयवंत मावळणकर (६०, वायंगिणवाडा, नास्नोळा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा प्रकार रविवारी सकाळी घडला. पुलाजवळ मासे पकडणार्‍या लोकांनी लता यांना पाण्याबाहेर काढले व म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले. उपचारावेळी त्यांचे निधन झाले. घटनेचा पंचनामा म्हापसा पोलिसांनी केला.