वाचनाची सवय, डिजीटल साक्षरतेसाठी आता राष्ट्रीय ई पुस्तकालय

पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी २३ भाषांतील ५५०० पुस्तके उपलब्ध

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
05th January, 04:20 pm
वाचनाची सवय, डिजीटल साक्षरतेसाठी आता राष्ट्रीय ई पुस्तकालय

पणजी : अभ्यासात (Study) तसेच विद्यार्थ्यांच्या (Students) सर्वांगीण प्रगतीत वाचनाचे (Reading) महत्व अनन्यसाधारण आहे. डिजीटल साक्षरतेबरोबरच (Digital Literacy) विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागण्यासाठी विद्यालयांनी राष्ट्रीय ई पुस्तकालय पोर्टलवर नोंदणी करून पोर्टलवरील (Portal) उपलब्ध सुविधांचा उपयोग करावा, असे परिपत्रक शालान्त मंडळाने जारी केले आहे.

राज्यातील सर्व विद्यालये तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांना हे परिपत्रक पाठविण्यात आले आहे. राष्ट्रीय ई पुस्तकालय पोर्टलवरील पुस्तके व अन्य सुविधांचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा, असे पत्र केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण खात्याने पाठविले आहे. या पत्राला अनुसरून शालान्त मंडळाने परिपत्रक जारी केले आहे.

राष्ट्रीय ई पुस्तकालय पोर्टलवर २३ भारतीय भाषांमधील ५५०० पुस्तके उपलब्ध आहेत. सुमारे २०० प्रकाशकांची ही पुस्तके विविध वयोगटातील मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून कोणत्या वयोगटासाठी कोणती पुस्तके वाचनासाठी योग्य आहेत, याची सूचीही तयार करण्यात आलेली आहे. ३ ते ८, ८ ते ११, ११ ते १४ व १४ वर्षांवरील विद्यार्थी अशा प्रकारे पुस्तकांची वर्गवारी करण्यात आली आहे. यामुळे कोणते पुस्तक कोणत्या विद्यार्थ्याला वाचनासाठी उपलब्ध करून द्यावे, हे ठरविणे शिक्षकांसाठी सुलभ होणार आहे. संकेतस्थळ (http://ndl.education.gov.in/home), अँड्रोयडच्या आधारे या पोर्टलवर नोंदणी केल्यास सर्व पुस्तके उपलब्ध होतील. पुस्तके व मजकुराची निवड तज्ज्ञांच्या मदतीने करण्यात आली आहे. पोर्टलचा शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रमाणात उपयोग करावा, असे निर्देश विद्यालयांना देण्यात आले आहेत.





हेही वाचा