प्रादेशिक वर्तमानपत्रांचा खप समाधानकारक!

दौलतराव हवालदार : गोवा मराठी पत्रकार संघातर्फे पुरस्कारांचे वितरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th January, 12:30 am
प्रादेशिक वर्तमानपत्रांचा खप समाधानकारक!

पणजी : आजच्या पत्रकारितेवर तंत्रज्ञानाचा परिणाम झाला आहे. आधुनिक काळातील विविध घटक पत्रकारितेवर परिणाम करत असले, तरी प्रादेशिक वर्तमानपत्रांचा खप मात्र समाधानकारक आहे. राज्यातील पन्नास टक्के विद्यार्थी वर्तमानपत्रे वाचत नाहीत, हे मात्र मोठे आव्हान आहे, असे मत दौलतराव हवालदार यांनी येथे व्यक्त केले. गोवा मराठी पत्रकार संघाने मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष वामन प्रभू, उपाध्यक्ष गुरुदास सावळ, सुरेश नाईक व सचिव सुभाष नाईक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यतिन हेगडे पुरस्कृत भारतकार हेगडे देसाई पुरस्कार धर्मानंद कामत यांना, प्राचार्य भास्कर नायक पुरस्कृत भारत मित्रकार ना. भा. नायक पुरस्कार गोकुळदास मुळवी यांना, तर डॉ. नितीन बोरकर पुरस्कृत लक्ष्मीदास बोरकर पुरस्कार छायापत्रकार सुनील नाईक यांना प्रदान करण्यात आले. सुरेश नाईक यांनी पुरस्कार प्राप्तांचा परिचय करून दिला.
धर्मानंद कामत यांचा पुरस्कार त्यांचे बंधू राजीव कामत यांनी, तर गोकुळदास मुळवी यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी अंजला व नातू गौरव यांनी स्वीकारला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोघेही उपस्थित राहू शकले नाही. गोवा मराठी पत्रकार संघाने घेतलेल्या दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी दौलतराव हवालदार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
वामन प्रभू यांनी स्वागत केले. गोवा पत्रकार संघ सांघिकरीत्या यापुढे संघाचे काम पुढे नेईल असे त्यांनी सांगितले. वामन प्रभू यांच्या अवांतर या पुस्तकाचे यावेळी प्रमुख पाहुण्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने माणिक मुंबई निर्मित बोरकर, पाडगावकर व माडगूळकर यांच्या गीतरचनांवर झालेल्या कार्यक्रमातील गायक कलाकार केतन पटवर्धन व वर्षा जोशी, निवेदिका ऐश्वर्या जोशी, तसेच संवादक आनंदयात्री प्रसाद कुलकर्णी व अतुल दाते यांचा सन्मान कार्यकारी सदस्य विठ्ठल पारवाडकर व दत्ता शिरोडकर यांनी केला. नितीन कोरगावकर यांनी मुख्य सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. सुभाष नाईक यांनी आभार मानले.
दिवाळी अंक स्पर्धेत ‘गोवन वार्ता’ अव्वल
गोवा विभागातील सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा मान ‘गोवन वार्ता’ला लाभला. हा पुरस्कार अरविंद धुरी व अमित पोकळे यांनी स्वीकारला. दिवाळी अंक स्पर्धेचे परीक्षक विजय कापडी, चंद्रकांत म.गावस व पौर्णिमा केरकर यांचाही गौरव यावेळी करण्यात आला.
‘चतुरंग अन्वय’ला प्रथम पुरस्कार
प्रथम पुरस्काराचा मानकरी होता सांगली येथील चतुरंग अन्वय दिवाळी अंक. महेश कराडकर व प्रशांत कुलकर्णी यांनी तो स्वीकारला. द्वितीय- वसा (मुंबई), तर तृतीय- मौज (मुंबई) यांना देण्यात आला. यासाठी रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. या स्पर्धेचे परीक्षक विजय कापडी, चंद्रकांत गावस व पौर्णिमा केरकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

हेही वाचा