विरोधात कोलवाळ येथे एकवटले टॅक्सी चालक

म्हापसा : गोव्यातील (Goa) मोपा विमानतळावरील (Mopa Airport) जीएमआर (GMR) कंपनीच्या नवीन नियमांचा राज्यातील सर्व पर्यटक टॅक्सीवाल्यांनी (Tourist Taxi) तीव्र संताप व्यक्त केला आहे. या नियमांनुसार, पिकअप, ड्रॉप झोनमध्ये २-५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणाऱ्या टॅक्सी चालकांकडून २१० रुपये शुल्क आकारले जात आहे. एवढ्या कमी वेळेत गाडीतून सामान काढणे व प्रवाशांशी समन्वय साधणे कठीण होते. वेळेची मर्यादा आणि दंड हा अव्यवहार्य असून; या हुकूमशाही निर्णयाचा टॅक्सीवाल्यांनी निषेध केला.
बुधवारी ७ रोजी सकाळी कोलवाळ येथे हाउसिंग बोर्ड परिसरात मोठ्या संख्येने टॅक्सी चालक एकत्रित आले. नंतर पोलीस अधिकारी आणि मामलेदारांनी टॅक्सीवाल्यांची समजूत काढून १५ सदस्यांचे एक शिष्टमंडळ जीएमआर अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मोपा विमानतळावर गेले. याविषयी टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी योगेश गोवेकर म्हणाले की, मोपा विमानतळावर जीएमआर कंपनीने मनमानी कारभार चालवला आहे. पिकअप व ड्रॉपसाठी येणाऱ्या वाहनांकडून दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास २१० रुपये शुल्क आकारले जात आहे. हा टॅक्सी मालकांवर आर्थिक भुर्दंड आहे. या निर्णयाला आमचा तीव्र विरोध आहे. जीएमआर कंपनीने हा निर्णय मागे घ्यावा. तसेच तेथे उभारलेले गतिरोधक हटवावेत आणि टोल पॉइंटही काढावा, अशी मागणी आम्हा सर्वांची आहे.
जीएमआर कंपनी सध्या सरकारचा जावई झाला आहे. विमानतळावर जीएमआरने गाडीतून सामान काढण्यासाठी स्वतःचे कर्मचारी नेमावे, जेणेकरून त्यांना वस्तुस्थिती समजेल. जोपर्यंत हा निर्णय मागे घेत नाहीत, तो पर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील, असा इशारा गोवेकर यांनी दिला.