
पणजी : गोव्यातील (Goa) डिचोली पोलिसांनी (Bicholim Police) संशयितरित्या फिरत असलेल्या दोघा मंगळसूत्र चोरांना पकडले. दोघेही अस्नोडेच्या जंक्शन जवळ एका मोटरसायकलने (Motorcycle) फिरत होते. त्यांनी काही वयस्क महिलांना अडवून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला.
उपनिरीक्षक एस. कामत आणि पोलीस कॉन्स्टेबल दयेश खांडेपारकर यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट पोलीस ओळखपत्र, फेस मास्क, दगड आणि काचेच्या बांगड्या सापडल्या. त्यांच्याकडे असलेली मोटरसायकल चोरीची असल्याचा संशय आहे. संशयितांनी आपली ओळख गुलाम शिराज अब्बास (४० वर्षे, सांगली, महाराष्ट्र) आणि असदुल्ला अफजल अली (३५ वर्षे, बिदर, कर्नाटक) अशी दिली आहे. त्यांनी २० डिसेंबर, २०२५ ला डिचोलीत एका महिलेला फसवून तिचे मंगळसूत्र चोरल्याचे कबुल केले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजय राणे व पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अधिक तपास करीत आहेत.