उत्तर गोव्यात भाडेकरूंच्या कसून पडताळणीचे आदेश : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
09th January, 10:43 am
उत्तर गोव्यात भाडेकरूंच्या कसून पडताळणीचे आदेश : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

पणजी : उत्तर गोव्यात (North Goa) निवासी व व्यावसायिक ठिकाणी राहणारे सर्व भाडेकरू, पर्यटक (Tourist) व सर्वांची कसून पडताळणी करण्याचे निर्देश; उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी (North Goa Collector) दिले आहेत. 

या आदेशानुसार;  घरे, इमारती, फ्लॅट्स, हॉटेल्स, लॉजेस, शॅक्स, खाजगी गेस्ट हाऊसेस, पेइंग-गेस्ट सुविधा आणि धार्मिक संस्था इत्यादी ठिकाणी मालकांनी कोणत्याही व्यक्तीला राहण्याची परवानगी देण्यापूर्वी तिची ओळख तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड किंवा पासपोर्टसारख्या वैध ओळखपत्राचा वापर करून त्या व्यक्तीच्या तपशिलाची पडताळणी करणे आवश्यक आहे. उत्तर गोव्यात कोणत्याही व्यक्तीला राहण्याची परवानगी देण्यापूर्वी मालकांनी भाडेकरू, अभ्यागत किंवा पाहुण्यांचा पडताळणी अर्ज भरणे देखील आवश्यक आहे. नंतर हे अर्ज पुढील पडताळणी आणि नोंदीसाठी स्थानिक पोलीस ठाण्यात सादर करणे आवश्यक आहे. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय पर्यटन राज्य असलेल्या गोव्यात देशविदेशातून अनेक लोक येतात. काही वेळा अट्टल गुन्हेगारही पर्यटक बनून गोव्यात वास्तव्य करून राहतात. नंतर ते घरफोड्या, दरोडे टाकणे किंवा खून करणे यांसारखे गुन्हे करून गोव्याबाहेर पळून जातात. त्यांची पुरेसी ओळख ठेवलेली नसल्याने पोलिसांना त्यांना शोधून काढणे कठीण जाते. गोव्यात वास्तव्य करून राहत असलेल्यांची पुरेसी ओळख मिळावी; यासाठीच वरील निर्देश देण्यात आले आहेत. 

दरम्यान,  एका स्वतंत्र आदेशात उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी १२ जानेवारी ते १६ जानेवारी दरम्यान नियोजित असलेल्या गोवा विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

हेही वाचा