मोपा विमानतळावर ३.१६ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

प्रवासी अटकेत : गोवा कस्टम विभागाकडून कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th January, 10:57 pm
मोपा विमानतळावर ३.१६ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

पणजी :  मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथे गोवा कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू ) मोठी कारवाई करत तब्बल ९ किलोपेक्षा अधिक हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे ३.१६ कोटी इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी बिलाल मोहिझिन या प्रवाशाला अटक करण्यात आली.

दि. ७ जानेवारी रोजी बँकॉकहून ताश्कंदमार्गे गोव्यात आलेल्या एका प्रवाशाला कस्टम्स अधिकाऱ्यांनी थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान त्याच्या चेक-इन बॅगमधून ९.०३६ किलो हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. हा गांजा कपड्यांच्या खाली लपवून ठेवण्यात आला होता. 

जप्त केलेल्या पदार्थाची चाचणी करण्यात आली असता तो अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत संबंधित प्रवाशाला अटक करून संपूर्ण साठा जप्त करण्यात आला.

बँकॉक–ताश्कंद–गोवा असा अप्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय मार्ग का वापरण्यात आला, या अमली पदार्थांचा उगम कुठे आहे आणि गोव्यात त्याचा पुरवठा कुठे होणार होता, याचा तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेला प्रवासी एखाद्या संघटित तस्करी टोळीशी निगडित आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

गोव्यात विशेषतः पर्यटन आणि नाईट लाईफशी संबंधित भागांमध्ये हायड्रोपोनिक गांजासारख्या महागड्या अमली पदार्थांचा शिरकाव वाढत असल्याबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पुन्हा ही बाब अधोरेखित झाली आहे. 

सरकारच्या ‘नशामुक्त भारत’ अभियानाअंतर्गत देखरेख आणि अंमलबजावणी आणखी कडक करण्यात येणार असून अशा तस्करीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असे कस्टम्स अधिकाऱ्यांनी सांगितले.

बिलाल मोहिझिन याला अमली पदार्थप्रकरणी अटक करण्यात आली. यानंतर त्याने म्हापसा येथील सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याच्या जामीन अर्जावर दि. १२ रोजी सुनावणी होणार आहे. त्याचा अन्य प्रकरणात तपास आहे का? याचाही शोध घेण्यात येत आहे. 

हेही वाचा