अज्ञात रोगामुळे सत्तरी तालुक्यात कुत्री दगावण्याच्या प्रकारांत वाढ

दोन महिन्यांत १०० पेक्षा कुत्री दगावली : पशुसंवर्धन खात्याने दखल घेण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th January, 09:10 pm
अज्ञात रोगामुळे सत्तरी तालुक्यात कुत्री दगावण्याच्या प्रकारांत वाढ

वाळपई : सत्तरी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून भटकी तसेच पाळीव कुत्र्यांना एका विशिष्ट आजाराची लागण झाल्याने कुत्र्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक कुत्रे मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली असून, यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सावर्डे, खोतोडा, भिरोंडा पंचायत क्षेत्रातील अनेक गावांमध्ये कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. मृत पावलेल्या कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाळीव कुत्र्यांचा समावेश आहे.

आजाराची लक्षणे गंभीर

या आजाराची लागण झालेल्या कुत्र्यांमध्ये खाणे-पिणे बंद होणे, अंगात त्राण नसणे, चालताना लडखडणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. हळूहळू त्यांची प्रकृती अधिकच खालावत जाऊन काही दिवसांत त्यांचा मृत्यू होत आहे. काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अवघ्या १५ दिवसांत कुत्रे या आजारामुळे दगावत आहेत.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कुत्र्यांच्या वाढत्या मृत्यूमुळे अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आजार माणसांनाही होऊ शकतो का, अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा आजार माणसांना होणार नाही, असे स्पष्ट केले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

उपचाराअभावी मृत्यू वाढत असल्याचा आरोप

या आजारावर लस देणे व सलाईन लावणे आवश्यक असते, मात्र ही सुविधा फक्त वाळपई दवाखान्यातच उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. घरापर्यंत उपचार सेवा उपलब्ध नसल्यामुळे अनेक कुत्रे उपचाराअभावी मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जर ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर येत्या काळात कुत्र्यांच्या मृत्यूची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारच्या पशुवैद्यकीय खात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने दारापर्यंत उपचार सेवा सुरू करावी, अशी मागणी सत्तरी तालुक्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

घरापर्यंत उपचार देण्यास खात्याचा नकार

सध्या वाळपई येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, पशुवैद्यकीय खात्याकडून घरापर्यंत उपचार सेवा देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या घरांमध्ये, शेतात किंवा फार्महाऊसमध्ये पाळीव कुत्रे असल्याने त्यांना वाळपईपर्यंत आणणे शक्य होत नाही. वाहनांची सोय नसल्यामुळे अनेक आजारी कुत्र्यांना वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत.


हेही वाचा