१० वी, १२ वी आणि पदवीधरांसाठी मोठी संधी

नवी दिल्ली: कर्मचारी भरती आयोगाची (SSC) तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आयोगाने २०२६-२७ या वर्षासाठीचे अधिकृत परीक्षा वेळापत्रक (कॅलेंडर) प्रसिद्ध केले आहे. या नवीन वेळापत्रकानुसार, विविध सरकारी विभागांमधील भरती प्रक्रिया मे २०२६ पासून सुरू होऊन मार्च २०२७ पर्यंत चालणार आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांना आता आपल्या अभ्यासाची पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार असून, एक सुनियोजित रणनीती आखणे सोपे होणार आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, मे २०२६ मध्ये जेएसए, एलडीसी आणि एसएसए यांसारख्या पदांसाठी परीक्षा घेतल्या जातील. पदवीधर उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 'कम्बाइन ग्रॅज्युएट लेव्हल' (CGL) टियर-१ परीक्षा आणि कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) या परीक्षा मे आणि जून २०२६ मध्ये आयोजित केल्या जातील. यासाठी मार्च-एप्रिल २०२६ मध्ये अर्ज प्रक्रिया राबवली जाईल.
| परीक्षेचे नाव | टियर/फेज | अर्ज करण्याची तारीख | परीक्षेचा महिना |
| CGL २०२६ | टियर-१ | मार्च-एप्रिल २०२६ | मे-जून २०२६ |
| ज्युनिअर इंजिनिअर | टियर-१ | मार्च-एप्रिल २०२६ | मे-जून २०२६ |
| CHSL (१२ वी पास) | टियर-१ | मार्च-मे २०२६ | जुलै-सप्टेंबर २०२६ |
| स्टेनोग्राफर (C आणि D) | CBSE | एप्रिल-मे २०२६ | ऑगस्ट-सप्टेंबर २०२६ |
| MTS | CBSE | जून-जुलै २०२६ | सप्टेंबर-नोव्हेंबर २०२६ |
| दिल्ली पोलीस (SI) | पेपर-१ | मे-जून २०२६ | ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ |
| कॉन्स्टेबल GD | CBSE | सप्टेंबर-ऑक्टोबर २०२६ | जानेवारी-मार्च २०२७ |
त्यानंतर, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी असणारी 'कम्बाइन हायर सेकंडरी लेव्हल' (CHSL) परीक्षा जुलै ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पार पडेल. स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी तसेच हिंदी ट्रान्सलेटर पदांसाठी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सर्वात मोठी मानली जाणारी 'मल्टी टास्किंग स्टाफ' (MTS) परीक्षा सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२६ या काळात होणार असून, दिल्ली पोलिसांमधील उपनिरीक्षक पदासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेतली जाईल.
परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
या वेळापत्रकाचा शेवट २०२७ च्या सुरुवातीला 'कॉन्स्टेबल जीडी' या परीक्षेने होईल. ही परीक्षा जानेवारी ते मार्च २०२७ दरम्यान आयोजित केली जाईल. इच्छुक उमेदवारांना एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार १० वी, १२ वी आणि पदवी पूर्ण असलेले उमेदवार या संधीचा लाभ घेऊ शकतात. अधिकृत अधिसूचना आणि अर्जाच्या तारखांमधील बदलांसाठी उमेदवारांनी नियमितपणे आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.