सरपंच संदीप मेस्त्रींच्या पुढाकाराने कोकणातील कलमठ गाव साकारतोय सामाजिक क्रांती!

कणकवली: पतीच्या निधनानंतर स्त्रीचा आत्मसन्मान हिरावून घेणाऱ्या 'विधवा' प्रथेला मूठमाती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ज्या घरामध्ये ही कुप्रथा पाळली जाणार नाही, अशा कुटुंबांची घरपट्टी आणि पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा क्रांतिकारी ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते मंजूर केला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, आर्थिक सवलतीच्या माध्यमातून सामाजिक बदलाची नवी दिशा कलमठने समाजाला दाखवून दिली आहे.
मंगळसूत्र काढणे, कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे आणि शुभकार्यात विधवा महिलांना जाणीवपूर्वक दूर ठेवणे यांसारख्या प्रथा आजही समाजाच्या काही भागांत टिकून आहेत. या अनिष्ट रूढींमुळे महिलांचे सामाजिक अस्तित्व नाकारले जाते. ही बाब लक्षात घेऊन कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत हा प्रस्ताव मांडला. केवळ भाषणांनी किंवा उपदेशाने समाज बदलत नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष कृतीची आणि प्रोत्साहनाची गरज असते, या भूमिकेतून त्यांनी घरपट्टी-पाणीपट्टी माफीचा अभिनव पर्याय समोर ठेवला. या निर्णयाला ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठा पाठिंबा दिला आहे.
सरपंच संदीप मेस्त्री यांनी स्वतःच्या घरातूनच या बदलाची सुरुवात केली आहे. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आपल्या आईला कोणत्याही जुन्या रूढींचे पालन न करता त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. हाच आदर्श आता संपूर्ण गावाने स्वीकारावा, असा त्यांचा मानस आहे. 'महिला स्नेही गाव' या संकल्पनेअंतर्गत कलमठ ग्रामपंचायतीने यापूर्वीही सॅनिटरी पॅड्स वाटप, कौशल्य विकास आणि उद्योजकता यांसारख्या क्षेत्रांत काम केले आहे. या नव्या निर्णयामुळे कोकणातील सामाजिक चळवळीत कलमठचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. कोल्हापूरच्या हेरवाड ग्रामपंचायतीनंतर असा धाडसी निर्णय घेणारी कलमठ ही कोकणातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला नवे बळ मिळणार आहे.