माय-लेकाचा 'तो' व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

मुंबई: आईने आपल्या मुलांसाठी घेतलेल्या कष्टाची आणि त्यागाची किंमत कधीच पैशात करता येत नाही. मात्र, त्याच आईच्या खांद्यावरील कर्जाचे ओझे उतरवून तिला सुखाचे दोन घास देण्याचे भाग्य ज्या मुलाला लाभते, तो मुलगा खऱ्या अर्थाने श्रीमंत ठरतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका भाग्यवान माय-लेकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, त्याने लाखो लोकांच्या काळजाला हात घातला आहे. अवघ्या १७ वर्षांच्या 'अमन दुग्गल' या तरुणाने आपल्या आईचे १०,००० पाउंड म्हणजेच जवळपास १२ लाख रुपयांचे कर्ज फेडून तिला एक अविस्मरणीय 'सरप्राईज' दिले आहे.

'अमन दुग्गल' नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये माय-लेकातील नात्याचा ओलावा स्पष्टपणे जाणवतो. व्हिडिओच्या सुरुवातीला अमन आपल्या आईशी अत्यंत भावूक होऊन बोलताना दिसतो. त्याच्या आवाजातील थरथर स्पष्ट जाणवते, तरी आपल्या आईप्रती असलेला कृतज्ञतेचा भाव आणि आत्मविश्वास मोठा आहे. तो आपल्या आईला सांगतो की, तू माझ्या आयुष्यातील सर्वात खास स्त्री आहेस आणि तू माझ्यासाठी जे त्याग केले आहेत, त्यासाठी मी तुझा ऋणी आहे आणि सदैव राहीन. अमनचे हे शब्द ऐकताच आईचे डोळे पाणावले. जणू तिला जाणीव झाली होती की, तिचा लेक आता केवळ मोठाच झाला नाही, तर जबाबदारही झाला आहे.
पहा व्हिडिओ
या भावनिक क्षणी अमन आपल्या आईला डोळे उघडायला सांगितले आणि तिच्या हातात पैसे ठेवले. आई, हे पैसे तुझे सर्व कर्ज फेडण्यासाठी आहेत, असे जेव्हा तो म्हणाला, तेव्हा त्या माऊलीला आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. इतक्या लहान वयात आपल्या मुलाने एवढी मोठी कामगिरी करावी, हे पाहून तिला अश्रू अनावर झाले. तिने आपल्या लेकाला घट्ट मिठी मारली आणि दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. अमनने केवळ कर्जच फेडले नाही, तर इथून पुढे घराची सर्व बिलं आणि खर्च तो स्वतः उचलणार असल्याचे वचनही दिले.

अमनने या व्हिडिओसोबत एक मोठी पोस्ट शेअर केली असून त्यात त्याने आपल्या संघर्षाचा उल्लेख केला आहे. केवळ एका वर्षाच्या मेहनतीतून त्याने हे स्वप्न पूर्ण केले. तरुण पिढीवर अनेकदा बेजबाबदारपणाचा शिक्का मारला जातो, मात्र अमनसारखी मुले समाजासमोर एक नवा आदर्श उभा करत आहेत. आपल्या आई-वडिलांनी सोसलेल्या कष्टाचे चीज करणे आणि त्यांच्या आयुष्यातील 'जनरेशनल कर्स' तोडणे किंवा जनरेशनल ट्रॉमामधून बाहेर पडून आपल्या लोकांसाठी काही तरी करणे हेच आजच्या अनेक तरुणांचे ध्येय असते. हा व्हिडिओ अशाच ध्येयाने पेटलेल्या तरुणांसाठी आशेचा एक नवा किरण ठरला आहे. सोशल मीडियावर या 'श्रवणबाळा'वर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.