आश्चर्य! सत्ता मिळवण्यासाठी भाजपची काँग्रेससोबत युती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th January, 04:29 pm
आश्चर्य! सत्ता मिळवण्यासाठी भाजपची काँग्रेससोबत युती

ठाणे : अंबरनाथ नगरपरिषदेत सत्तास्थापनेसाठी भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करणे काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना महागात पडले आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्व १२ नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले असून, अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीही बरखास्त केली आहे. या धक्कादायक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात 'महायुती'मध्ये एकत्र असलेले भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना येथे आमनेसामने उभे ठाकले होते. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने चक्क काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मदतीने आपली मोट बांधली. भाजपचे १६, काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादीचे ४ अशा ३२ नगरसेवकांच्या बळावर भाजपच्या तेजश्री करंजुले यांनी शिवसेनेच्या मनिषा वाळेकर यांचा पराभव करत नगराध्यक्षपद पटकावले. मात्र, 'काँग्रेसमुक्त भारता'ची घोषणा देणाऱ्या भाजपने काँग्रेससोबत केलेली ही युती आणि काँग्रेसने भाजपला दिलेला पाठिंबा यावरून टीकेची चौफेर झोड उठली आहे.

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतलेली ही कठोर भूमिका स्थानिक पातळीवरील नेत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रदेश कार्यालयाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय पक्षविरोधी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी या युतीवर 'हा संधीसाधूपणा' असल्याची टीका करत भाजपने घात केल्याचा आरोप केला आहे. यावर उत्तर देताना भाजप उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळेच अंबरनाथच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण प्रकरणामुळे अंबरनाथमधील राजकारण चांगलेच तापले असून, आगामी काळात येथील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा