मडगाव रेल्वेस्थानकावर २०३० पर्यंत गाड्यांच्या संख्येत दुपटीने वाढ

कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार : पायाभूत सुविधा निर्मितीवर भर

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
08th January, 11:14 am
मडगाव रेल्वेस्थानकावर २०३० पर्यंत गाड्यांच्या संख्येत दुपटीने वाढ

मडगाव : कोकण रेल्वेचे (Konkan Railway) मडगाव रेल्वे स्टेशन ( Railway Station) हे प्रमुख जंक्शन असून; या रेल्वेस्थानकावरील गाड्यांची क्षमता २०३० पर्यंत दुप्पट करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार येत्या काही वर्षांत पायाभूत सुविधा उभारणी, कोचिंग टर्मिनल्स व प्रवाशांसाठी सोयीसुविधा उभारणीची कामे टप्प्याटप्प्याने केली जात आहेत, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 प्रवासाच्या मागणीतील जलद आणि सातत्यपूर्ण वाढ लक्षात घेता, पुढील ५ वर्षांत प्रमुख शहरांमधून नवीन गाड्या सुरू करण्याची क्षमता सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट करणे आवश्यक आहे. आगामी वर्षांची गरज पूर्ण करण्यासाठी सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक असल्याचे भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने मडगाव रेल्वेस्थानकावरीलही साधनसुविधांसह रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. 

    मडगाव स्थानकावर प्रवाशांची सोय सुधारण्यासाठी आणि त्यांना अतिरिक्त सुविधा देण्यासाठी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. अलीकडेच पूर्ण झालेल्या कामांमध्ये रेल आर्केड, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बॅटरीवर चालणार्‍या गाड्या आणि लिफ्ट व रॅम्पसह सर्व प्लॅटफॉर्मला जोडणारा नवीन पादचारी पूल यांचा समावेश आहे. नवीन पादचारी पुलाच्या बांधकामाचा खर्च १५ कोटी रुपये होता. २४ कोचच्या एलएचबी रेकसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि हाताळणी क्षमता सुधारण्यासाठी व शंटिंगचा वेळ कमी करण्यासाठी नवीन स्टेबलिंग लाइनचे कामही पूर्ण झाले आहे. ‘वंदे भारत’ गाड्यांसाठी तपासणी सुविधा देखील सुरू करण्यात आल्या आहेत.  इतर कामे जी लवकरच सुरू केली जाणार आहेत, त्यामध्ये ट्रान्झिट लाउंज आणि मडगाव स्थानकावर २४ कोचच्या एलएचबी रेकसाठी पिट लाइनचा विस्तार यांचा समावेश आहे.

 वाढत्या क्षमतेची गरज पूर्ण करण्यासाठी, मडगाव स्थानकासाठी एका नवीन पूर्ण लांबीच्या प्लॅटफॉर्मची योजना आखली जात आहे. नवीन ‘रिंग रोड’सोबत ‘इंटर-मॉडल कनेक्टिव्हिटी’ सुलभ करणारा १२ मीटर रुंद पादचारी पूल आणि स्टेशन इमारतीसह नवीन दुसर्‍या प्रवेशद्वाराचाही प्रस्ताव आहे. नियोजित असलेल्या इतर सुविधांमध्ये एका नवीन स्टेबलिंग लाइनचा समावेश आहे, ज्यामुळे पिट लाइन यार्डमधील हालचाल सुधारेल आणि शंटिंगचा वेळ कमी होईल. मडगाव यार्डमध्ये नवीन पिट लाइन सामावून घेण्यासाठी एक सर्वेक्षण सुरू आहे; ज्याद्वारे नवीन गाड्या सुरू करण्याची योजना आखता येणार आहे.

टप्प्याटप्प्याने होणार कामे 

२०३० सालापर्यंत मडगाव जंक्शनवर गाड्या सुरू करण्याची क्षमता दुप्पट करण्याच्या कामांसाठी काही प्रमुख कामे हाती घेण्यात आलेली आहेत. यात सध्याच्या टर्मिनल्समध्ये अतिरिक्त प्लॅटफॉर्म, स्टेबलिंग लाईन्स, पिट लाईन्स आणि पुरेशा शंटिंग सुविधांची भर घालणे. शहरी भागात आणि आसपास नवीन टर्मिनल्स ओळखणे आणि तयार करणे. मेगा कोचिंग कॉम्प्लेक्ससह देखभालीच्या सुविधा निर्माण करणे, तसेच विविध ठिकाणी वाढलेल्या गाड्या हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक सुविधांची कामे, सिग्नलिंगचे आधुनिकीकरण आणि मल्टीट्रॅकिंगद्वारे विभागीय क्षमता वाढवणे या कामांचा समावेश आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार : रेल्वेमंत्री 

वाढत्या प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी प्रमुख शहरांमधील कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार करत आहोत. या निर्णयामुळे रेल्वे नेटवर्कचे आधुनिकीकरण होईल आणि देशभरातील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, अशी माहिती रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. 


हेही वाचा