सायबर सुरक्षा : सावधानता हाच एकमेव बचाव

सायबर ठगांच्या हाती पोहोचलेले पैसे हे रोख स्वरुपात असतात. त्यामुळे ते पाण्यासारखे खर्च होतात. ते जप्त करणे जवळजवळ अशक्यच आहे. त्यामुळे मोबाईल हाताळताना अधिकाधिक काळजी घेणे, हाच सायबर गुन्हे रोखण्याचा एकमेव मार्ग आहे.

Story: विचारचक्र |
08th January, 11:58 pm
सायबर सुरक्षा : सावधानता हाच एकमेव बचाव

देश-विदेशात काबाडकष्ट करून गोमंतकीयांनी कमावलेल्या सुमारे ११९ कोटी रुपयांवर सायबर गटांनी गेल्या वर्षभरात डल्ला मारला आहे. गोव्यात सायबर गुन्ह्यांचे जाळे किती मोठ्या प्रमाणात पसरलेले  आहे, ही गोष्ट या‌ धक्कादायक आकडेवारीवरून दिसून येते. आम्ही सगळेच गोमंतकीय मग ते उच्चशिक्षित, उच्चवर्णीय असो किंवा अल्पशिक्षित एसटी समाजातील असो, स्वतःला अतिशहाणे समजतो. मात्र जगभरातील सायबर गटांना आपण अगदी सहजपणे गोमंतकीय बळी पडतो. गेल्या वर्षभरात सुमारे ६ हजार गोमंतकीय सायबर  ठगांच्या भूलथापांना बळी पडले असून ११९ कोटींहून अधिक रकमेवर पाणी सोडावे लागले आहे. ही आकडेवारी पोलिसांत दाखल झालेल्या ‌गुन्ह्यांची आहे. त्याशिवाय अशी अनेक ‌प्रकरणे असणार की बळी पडलेल्या लोकांनी लोकलज्जेस्तव मौन पाळणेच शहाणपणाचे वाटले असणार.

२२ हजारांची एकरकमी गुंतवणूक करून आयुष्यभर अब्जावधी रुपये घरबसल्या कमवा अशा अफलातून योजनेची जाहिरात आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन करत असल्याचे फेसबुकवर गेले वर्षभर दाखविण्यात येत होते. गेल्या महिन्याभरात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती मुकेश अंबानी, पत्रकार राजदीप सरदेसाई आदी महनीय लोकांच्या तोंडून लोकांना महामूर्ख बनविणारी ही जाहिरात प्रक्षेपित होऊ लागली. फेसबुकवर जाताच या जाहिरातींचा एवढ्या मोठ्या प्रमाणात मारा होऊ लागला की, त्या जाहिराती खऱ्याच असाव्यात असे वाटू लागले. बँकेत नोकरी करणाऱ्या मुलीशी संपर्क साधला तेव्हा अशी कोणतीही योजना आर्थिक चौकटीत शक्य नसल्याचे खडसावून सांगितले. मात्र ही योजना खरीच असणार असे मला मनोमन वाटत होते. ही जाहिरात फसवी असल्यास फेसबुकने त्यावर बंदी घातली नसती काय? असा प्रश्न स्वतःलाच विचारला.  राजदीप सरदेसाई हे पत्रकार असल्याने त्यांनी तरी तक्रार केली नसती काय? त्यामुळे ही जाहिरात खरीच असणार असे मनोमन वाटू लागले. त्यामुळे गेले तर २२ हजारच गेले, असे म्हणत या योजनेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. पण फोन पेवर पैसै पाठवणे न जमल्याने  माझे २२ हजार वाचले, अन्यथा ही रक्कम अक्कल खाती जमा झाली असती. माझ्याप्रमाणेच कितीतरी लोक या फसव्या जाहिरातीला  नक्कीच बळी पडलेले असणार!

सायबर ठग लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळ्या अफलातून योजना आखतात. डिजिटल अरेस्ट हा त्यापैकीच एक प्रकार! डिजिटल   अरेस्टद्वारे एका ज्येष्ठ महिलेला ७ लाखांचा गंडा घातला, अशी बातमी वर्षभरापूर्वी वर्तमानपत्रातून वाचली तेव्हा डिजिटल अरेस्ट म्हणजे काय हे कळलेच नाही. एका पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा केल्यानंतर डोक्यात प्रकाश पडला. तुमच्या नावावर एक पार्सल आले असून त्यात ड्रग्ज सापडले आहेत, त्यामुळे तुम्हाला आता अटक होणार असे फोनवरून सांगितले जाते. अटक टाळायची असल्यास अमूक रक्कम या बँक खात्यात जमा करा, असे बजावले जाते. ड्रग्ज, कस्टम हे शब्द कानी पडले की सर्वसामान्य नागरिक अगदी घाबरून गोंधळून जातो. अटक टाळण्यासाठी कोणताही विचार न करता सायबर ठग सांगेल ती रक्कम देऊन टाकतो. असा एखादा बकरा सापडला की त्याला पुरता पिळून काढला जातो.

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आदी समाजमाध्यमांवर संपर्क साधून मैत्री केली जाते. फेसबुकवर खाते उघडताना दिलेल्या माहितीची कोणतीही पडताळणी केली जात नाही. त्यामुळे ही माहिती विश्वसनीय मुळीच नसते. काही वेळा इतरांची फसवणूक करण्यासाठीच बनावट माहिती देऊनच ही खाती उघडली जातात. एकदा मैत्री जमली की वेगवेगळे रंगेल चाळे करून जाळ्यात ओढले जाते. काही वेळा अर्थतज्ज्ञ, गुंतवणूकतज्ज्ञ असल्याचा आभास निर्माण करून २५-३० टक्के परतावा देणाऱ्या योजनांत गुंतवणूक करण्याचे सल्ले दिले जातात. एकदा बळी पडला की संपला!

गोव्यात ज्या सुमारे ६ हजार फसवणुकीच्या घटना घडल्या, त्यात  सर्वाधिक प्रकरणे ही अशा प्रकाराची मोठ्या प्रमाणात परतावा देणारी गुंतवणूक प्रकरणे आहेत. अशा प्रकारच्या काही बिगरबँकिंग वित्तिय संस्थांनी गोव्यात आपली दुकाने थाटून लोकांना मोठ्या प्रमाणात टोपी घातलेली आहे. आता हे सगळे धंदे ऑनलाईन होतात. त्यामुळे हे सगळे काळे धंदे पडद्यामागे राहून करणे शक्य होते.

आपल्या देशात  अवघ्याच काही विश्वसनीय गुंतवणूक कंपन्या आहेत, जिथे ३० टक्के परतावा मिळू शकतो. असे काही अपवादात्मक कंपन्या सोडल्या तर इतर कुठलीही कंपनी १२-१३ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा देणे शक्य नाही. त्यामुळे १३ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा देण्याचे आश्वासन कोणी दिले तर तो ठग आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवले  पाहिजे.

फेसबुक मित्रांची आपल्याला कोणतीही खरी माहिती नसते. त्यामुळे त्यांना आपल्या आर्थिक सुस्थितीची माहिती देणे घातक आहे. त्या माहितीचा वापर करून त्यांचे मित्र तुमची फसवणूक, लुबाडणूक करू शकतील. तुमच्या स्मार्ट मोबाईल फोनवर दिवसभर अनेक संदेश येत असतात. २ लाख कर्ज मंजूर झाले आहे. पैसे मिळविण्यासाठी खाली क्लिक करा, असे किमान २-३ संदेश रोज येत असतात. त्याशिवाय तातडीने पैसे हवेत? कॉल करा, हा संदेश तर हमखास येत असतो. पैशांची कितीही गरज असली तरी या किंवा अशा स्वरुपाच्या संदेशाला कधीच प्रतिसाद देऊ नका. ऑनलाईन फसवणुकीला सर्वसामान्य नागरिकांनी बळी पडू नये म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने खास जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. देशभरातील सर्व महत्वाची वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवरून कोट्यवधी रुपये खर्चून ही जागृती मोहीम राबविण्यात येत आहे, ‘मी मूर्ख नाही’ या नावाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र एवढे सारे करूनही लोक फसवणुकीला बळी पडत आहेत. सत्तरी तालुक्यात काल-परवाच उघडकीस आलेल्या प्रकरणात कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. असे एक नाहीत तर ६ हजार प्रकरणे गेल्या एका वर्षभरात गोव्यात घडलेली आहेत. गोवा पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने आपली सर्व शक्ती पणाला लावून सायबर ठगांवर कारवाई  केली आहे. ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेले ७६७ मोबाईल फोन रद्द करण्यात आले आहेत. १५१ सोशल मीडिया खाती बंद केली आहेत तर ५०७ प्लॅटफॉर्मही मोडीत काढण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणी गुंतलेले १४९ कोटी रुपये परत मिळवणे शक्य झालेले नाही. विविध खात्यांत वर्ग करण्यात आलेले कोट्यवधी रुपये इतर अनेक बँक खात्यांत वळविण्यात आले आहेत. यातील काही खाती भलत्याच लोकांकडून भाडेपट्टीवर  घेतलेली आहेत. त्यामुळे या प्रकरणी ठगांच्या हातात पडलेले पैसे परत मिळणे कठीण आहे. सायबर ठगांच्या हाती पोहोचलेले पैसे हे रोख स्वरुपात असतात. त्यामुळे ते पाण्यासारखे खर्च होतात. ते जप्त करणे जवळजवळ अशक्यच आहे. त्यामुळे मोबाईल हाताळताना अधिकाधिक काळजी घेणे, हाच सायबर गुन्हे रोखण्याचा एकमेव मार्ग आहे.


- गुरुदास सावळ

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)