कार्यालये खासगी कार्यक्रमांचे अड्डे होऊ नयेत

कार्मिक खात्याने आदेश काढून किमान सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे काम केले आहे. फक्त खाते प्रमुखांनी आपापल्या खात्यांमध्ये असे खासगी कार्यक्रम करून वेळ वाया घालवला जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

Story: संपादकीय |
08th January, 12:01 am
कार्यालये खासगी कार्यक्रमांचे अड्डे होऊ नयेत

गोव्यातील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये नेहमी वाढदिवसापासून निरोप समारंभ कार्यक्रमांच्या पार्ट्या होत असतात. त्यावर कळस म्हणून की काय हल्ली तर एका कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याचे लग्न होते, तर त्यासाठी केळवणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला! त्यासाठी सजून धजून येण्यापर्यंत केळवणाची पूर्ण तयारीच केली होती. हे ऐकायलाही विचित्र वाटते, पण या गोष्टी सरकारी कार्यालयांत घडतात. आज कोणाचा वाढदिवस, कोणी नवी गाडी खरेदी केली, कोणाचे लग्न आहे, कोणाची सेवानिवृत्ती आहे तर वेगवेगळ्या कारणांमुळे सरकारी कार्यालयांमध्ये पार्ट्या सुरू असतात. एरवी लोक कामासाठी गेल्यानंतर ‘आज नाही सोमवारी ये,’ असे सांगण्याची सवय झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पार्ट्या आणि दुपारची झोप या गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. कामाच्या वेळी होणारे हे उपद्व्याप नंतर चांगल्या कर्मचाऱ्यांनाही बिघडवतात. एक म्हणजे बहुतेक कर्मचारी वेळेवर येत नाहीत. अनेकजण खाते प्रमुखांना चुना लावून दांड्याच मारत असतात. कुठल्याही दिवशी सरकारी कार्यालयात एखाद्या कामासाठी गेल्यास तिथला किमान एखादा कर्मचारी तरी रजेवर असतो किंवा बाहेर गेलेला असतो. तो कर्मचारी नसला तरी तुमचे काम होईल, पण ते कामच करायचे नसल्यामुळे जो गैरहजर आहे, त्याच्याकडे बोट दाखवून मोकळे व्हायचे. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब,’ हीच गोव्यातील बहुतेक सरकारी कार्यालयांतील पद्धत. लोकांनाही या गोष्टींची सवय झाली आहे. लोक कंटाळले तरी काही उद्धट कर्मचारी काम करून देण्याचे नाव घेत नाहीत. जेवणाच्या गप्पांपासून चहाला, खरेदीसाठी बाहेर जाण्यापर्यंत दिवसाला तीन-चार फेऱ्या कार्यालयाबाहेर असतात. 

गोव्यात ६४ हजार सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्या पगारावरच महिन्याला सुमारे साडेतीनशे कोटी खर्च होतात. किमान आपण घेत असलेल्या पगारासाठी तरी कर्मचाऱ्यांनी लोकांना चांगली सेवा द्यायला हवी. अनेक कर्मचाऱ्यांना कामात रस नसतो. निरोप समारंभ, वाढदिवस, सत्यनारायण करण्यातच त्यांना फार उमेद असते. अशा उत्साही कर्मचाऱ्यांमुळे प्रशासनाचा मात्र खेळखंडोबा होतो. गेल्या आठ दिवसांत सरकारने दोन वेळा वेगवेगळे आदेश काढून कामाच्या वेळेत बाहेरची कामे करणाऱ्या आणि कामाच्या वेळी वाढदिवस, निरोप समारंभाच्या पार्ट्या आणि गेम्सचे आयोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फटकारले आहे. खाते प्रमुखांनाही यातून संदेश दिला आहे. पहिल्या आदेशात सरकारी कर्मचारी कामाच्या वेळेत परवानगी नसताना बाहेर सूत्रसंचालन किंवा अन्य कामे घेतात, असे करणाऱ्यांना आता बजावले आहे. त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होऊ शकते. यापूर्वी पोलीस खात्याने असा आदेश काढून सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी शिस्तीत वागावे, नाटक, नृत्य करण्याच्या नादात पडू नये असे सुनावले होते. पोलीसच नव्हे तर इतर सरकारी खात्यांचीही हीच स्थिती आहे. अनेक कर्मचारी सरकारी काम सोडून बाहेरची अन्य कामे करत असतात. काहींनी बाहेर व्यवसायच थाटले आहेत. पूर्वी एक काळ होता, अनेक सरकारी कर्मचारी कुटुंबातील एखाद्याच्या नावे पॉलिसी करत फिरायचे. आता तो काळ थोडासा मागे पडून सरकारी नोकरीचा आधार घेऊन व्यवसाय थाटण्याचा काळ आला आहे. आपले व्यवसाय निश्चितच करावेत, पण ज्या कामासाठी लोकांच्या पैशातून पगार घेतला जातो ते काम विसरू नये.

कार्मिक खात्याने दोन महत्त्वाचे आदेश काढून प्रशासनात शिस्त आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. भलेही हे आदेश कोणाला तरी लक्ष्य करून काढलेले असतील, पण या आदेशांची गरज होती. फक्त आदेश काढून चालणार नाही तर, प्रशासन सुधारणा खात्यामार्फत त्यांच्यावर लक्षही असायला हवे. सूत्रसंचालन किंवा बाहेरची अन्य कामे करण्यासाठी सरकारी सेवेच्या वेळत बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वचक राहावा म्हणून पहिला आदेश काढला. सरकारी खात्यांमध्ये वाढदिवस, निरोप समारंभ किंवा खेळांचे आयोजन करून वेळ वाया घालवू नये, असा दुसरा आदेश काढला गेला. खाते प्रमुखांनीही आपल्या खात्यात काय चालले आहे, त्याची जाणीव ठेवावी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावावी. कार्मिक खात्याने आदेश काढून किमान सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे काम केले आहे. फक्त खाते प्रमुखांनी आपापल्या खात्यांमध्ये असे खासगी कार्यक्रम करून वेळ वाया घालवला जाणार नाही, याची खबरदारी  घ्यावी.