गतवैभव मिळवण्यासाठी काँग्रेसला आसाम महत्त्वाचे

Story: राज्यरंग |
08th January, 11:57 pm
गतवैभव मिळवण्यासाठी काँग्रेसला आसाम महत्त्वाचे

राज्यात विधानसभा निवडणूक मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपच्या तयारीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच घेतला. काँग्रेससाठी ईशान्य भारतात गतवैभव मिळविण्यासाठी आसाममध्ये विजय मिळविणे अपरिहार्य ठरणार आहे.

ब्रिटिश काळापासून शेतीकामांसाठी बंगाली नागरिकांचे राज्यात स्थलांतर होत होते. स्थलांतरितांमुळे स्थानिकांच्या अधिकारांवर गदा येत असल्याचा आरोप होऊ लागला होता. १९७१च्या युद्धानंतर बांगलादेशी घुसखोरी वाढली. त्यातूनच, ‘ऑल आसाम स्टुडंट्स युनियन’च्या (आसू) चळवळीचा जन्म झाला. १९७९पासून मोठे आंदोलन सुरू झाले. १९८५मध्ये आसाम करार झाला. करारानंतर झालेल्या निवडणुकीत आसाम गण परिषद (आगप) या नवख्या पक्षाने काँग्रेसला सत्ताच्युत केले. प्रफुल्लकुमार महंत मुख्यमंत्री झाले. आगपमध्ये फूट पडली आणि १९९१च्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. १९९६मध्ये अन्य पक्षांच्या मदतीने आगपने सत्ता संपादन केली. मात्र, आगपच्या घसरणीची सुरुवात झाली होती. ही पोकळी भरण्यासाठी भाजपने पायाभरणी सुरू केली. २००१ पासून तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली सलग तीन वेळा काँग्रेस सत्तेत होती. मात्र भाजपची कामगिरी उंचावत राहिली. आसाम करारामध्ये उल्लेख केलेल्या ‘एनसीआर’चा मुद्दा हाती घेत भाजपने २०१६मध्ये पहिल्यांदा विजय मिळविला.

पारंपरिकपणे मुस्लिम काँग्रेसचे मतदार होते. मात्र, २००५ मध्ये बद्रुद्दीन अजमल यांनी ‘एआययूडीएफ’ पक्ष स्थापन केला. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी १० जागा जिंकल्या. त्यानंतर तो पक्ष १८ जागांपर्यंत पोहोचला. सध्या या पक्षाचे १४ आमदार आहेत. ‘बांगलादेशी घुसखोरांचा पक्ष’ अशी टीका भाजपकडून या पक्षावर केली जाते. काँग्रेस आणि ‘एआययूडीएफ’ यांच्यात २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आघाडी झाली होती. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांत दुरावा निर्माण झाला. परिणामी ‘एआययूडीएफ’ची पाटी कोरीच राहिली. खुद्द अजमल यांचाही पराभव झाला. आता एआययूडीएफने ३५ उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेस आणि ‘एआययूडीएफ’ यांची आघाडी होणार की नाही, हे स्पष्ट नाही. दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले, तर मतविभागणी भाजप व आगप यांच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळे ‘एआययूडीएफ’ पक्ष काँग्रेससाठी मोठी अडचण ठरू लागला आहे.

सध्याचे राजकारण मुख्यमंत्री सरमा आणि काँग्रेस नेते गौरव गोगोई यांच्याभोवती फिरत आहे. दहा वर्षांपूर्वी सरमा काँग्रेसमध्ये होते. राहुल गांधी यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना २०२१मध्ये मुख्यमंत्रिपद दिले. आता सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येणारा पहिला काँग्रेसेतर पक्ष म्हणून भाजपला संधी आहे. त्याची मदार सरमा यांच्यावर आहे.

- प्रदीप जोशी