प्रशांत महासागरात युद्धसज्जतेची चाहूल

Story: विश्वरंग |
06th January, 10:14 pm
प्रशांत महासागरात युद्धसज्जतेची चाहूल

चीनसोबत भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या तणावाची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेने प्रशांत महासागर परिसरात आपली लष्करी तयारी मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वापरात असलेले जुने हवाई आणि नौदल तळ पुन्हा कार्यान्वित करण्याचे काम वेगात सुरू असून, अनेक ठिकाणी दिवस-रात्र इंजिनिअर आणि तांत्रिक पथके कार्यरत आहेत. युद्धजन्य परिस्थिती उद्भवलीच, तर कोणतीही वेळ वाया न घालवता कारवाई करता यावी, हा या सर्व प्रयत्नांचा मुख्य उद्देश आहे.

अमेरिकेने या व्यापक योजनेला ‘सेंट्रल एअर कॉरिडोर’ असे नाव दिले आहे. या अंतर्गत गुआम आणि टिनियन या प्रमुख लष्करी केंद्रांच्या भोवती असलेल्या बेटांवर नव्या धर्तीचे एअरफिल्ड विकसित केले जात आहेत. सैनिक, शस्त्रास्त्रे आणि आवश्यक सामग्री जलदगतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी ही साखळी उभारली जात आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जशी पद्धत वापरली जात होती, त्याच धर्तीवर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ही रचना उभी राहत आहे.

उत्तरी मारियाना द्वीपसमूहातील टिनियन बेटावरील ऐतिहासिक नॉर्थ फील्ड पुन्हा सज्ज केले जात आहे. अनेक वर्षे बंद असलेले हे एअरफिल्ड आता गुआममधील अँडरसन एअर फोर्स बेसला पूरक ठरणार आहे. दुसऱ्या महायुद्धात जगातील सर्वात मोठे मानले जाणारे हे एअरफिल्ड २३० हून अधिक बी-२९ बॉम्बर्सचे केंद्र होते. आज अमेरिकन नौदल, वायुसेना आणि मरीन दल एकत्र येऊन येथील धावपट्ट्या व सुविधा आधुनिक लढाऊ विमानांसाठी विकसित करत आहेत.

गुआममध्ये अँडरसन बेसजवळ उभारण्यात आलेल्या नॉर्थवेस्ट फील्डमुळे मोठ्या लष्करी विमानांसह मरीन कॉर्प्सच्या लढाऊ विमानांना थेट उड्डाण करता येणार आहे. दोन आठ हजार फूट लांबीच्या धावपट्ट्या, विस्तीर्ण पार्किंग क्षेत्र आणि शस्त्रसाठ्यासाठी मजबूत बंकर उभारण्यात आले आहेत. ओकिनावामधून मरीन सैनिकांचे स्थानांतर करण्यासाठीही हा तळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

टिनियन इंटरनॅशनल एअरपोर्टचा विस्तारही तितकाच महत्त्वाचा मानला जात आहे. गुआमवरील प्रमुख तळावर हल्ला झाल्यास हा विमानतळ पर्यायी केंद्र म्हणून वापरता येईल. भूमिगत इंधन साठवणूक, थेट जहाजातून इंधन भरण्याची सुविधा आणि टँकर विमानांसाठी विशेष हँगर येथे उभारले जात आहेत. याप बेटावरील इंटरनॅशनल एअरपोर्ट युद्धकाळात इंधन भरणे आणि आपत्कालीन लँडिंगसाठी सज्ज केला जाणार आहे.

या साऱ्या हालचाली प्रशांत क्षेत्रात अमेरिका दीर्घकालीन रणनीतीने तयारी करत असल्याचे स्पष्ट संकेत देतात. संभाव्य संघर्ष रोखण्यासाठीच ही सज्जता आहे, असा दावा केला जात असला तरी, या हालचालींमुळे जागतिक राजकारणात नव्या तणावाची चाहूल लागली आहे.

- सचिन दळवी