अशा व्यक्तीला मी आणि माझ्या विभूतींनी व्यापलेले सर्वकाही हे एकच आहे, अशी प्रतीती प्रत्यक्षात आलेली असते. जो अशा ऐक्य-भावाने माझे भजन करतो, त्याच्या भजनातही मीच नांदतो. असा अभेदभक्तियोग हा सदासर्वदा उत्तम.

अध्याय दहावा, विभूति-योग, श्लोक ४ व ५ बाबतीत विस्तृत विवेचन पुढे पाहूया.
हे पंडुपुत्रा,
भय, निर्भयता, अहिंसा, समता, तपोदान, संतोष, यश आणि अपकीर्ती हे जे भाव सर्वत्र दिसून येतात ते सगळे जीवांच्या ठायी माझ्यापासूनच निर्माण होतात. जसे जीव वेगवेगळे असतात, तसेच हे भावही वेगवेगळे असतात. कोणी माझ्या जाणिवेत जन्माला येतात तर कोणी माझ्या नेणिवेत जन्म घेतात. जसे प्रकाश व अंधार या दोहोंची उत्पत्ती सूर्यापासून म्हणजे त्याच्या उगवण्या-मावळण्या कारणाने आहे, तसेच माझ्या विषयीचे ज्ञान व अज्ञान हे भावाधीन आहेत. म्हणून सगळ्या जीवसृष्टीमध्ये माझे भिन्न भिन्न भाव भिन्न भिन्न स्वरूपात भरून राहिलेले आहेत. ज्या भावांच्या आधीन राहून सगळे लोक वागतात, आणि जे या सृष्टीचे पालक आहेत, ते अकरा भाव आता मी तुला सांगतो.
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा।
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा: प्रजा:।।६।।
सरळ अर्थ : हे अर्जुना, सात तर महर्षिजन आणि चार त्यांच्याही पूर्वी झालेले सनकादिक तसेच स्वायंभुवादी चौदा मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वहीजण माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत आणि जगात यांच्याच या सर्व प्रजा आहेत.
विस्तृत विवेचन : अर्जुना, सर्व महर्षींमध्ये श्रेष्ठ गुणांचे ज्ञाते असलेले असे कश्यपादी सात ऋषी प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वसिष्ठ. (कश्यप हा मरीचीला कर्दम कन्या कला हिच्यापासून झालेला पुत्र. याला प्राचेतस् दक्षाने आपल्या अदिती, दिती, दनू, सिंहिका, विनता, कद्रू, इत्यादी तेरा कन्या दिल्या होत्या. देव, दैत्य, दानव, सर्प इत्यादी यापासूनच झाले. वरील सात ऋषी हे चालू मन्वंतरातील सप्तर्षी. प्रत्येक मन्वंतरांत निरनिराळे सप्तर्षी असतात. त्यांच्या नावांमध्ये एकवाक्यता आढळत नाही). तसेच चौदा मनूंपैकी पहिले मुख्य चार मनू. ते म्हणजे स्वायंभुव, स्वारोचिष, औत्तमी आणि तामस. (बाकीचे दहा मनू येणेप्रमाणे - रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष, ब्रह्म, धर्म, रुद्र, देव व इंद्र सावर्णी. असे चौदा मनू एका कल्पात असतात). ते सात व हे चार असे मिळून अकरा जण. सृष्टीचा व्यापार चालावा म्हणून हे अकरा जण मी योजले.
हे पार्था, त्यावेळी स्वर्गादिक लोकांची व्यवस्था नव्हती. त्रैलोक्याची रचनाही त्यावेळी मांडली गेली नव्हती. पंचमहाभूतांचा समुदायही तेव्हा कार्यप्रवण नव्हता! तेव्हा झालेले हे सात ऋषी आणि चार मनू. त्यांनीच मग दिशादीठ अष्टलोकपालांची रचना लावली. म्हणजे आठ दिशांचे आठ स्वामी नेमून दिले. पूर्वेचा इंद्र, आग्नेयेचा अग्नी, दक्षिणेचा यम, नैऋत्येचा नैर्ऋती, पश्चिमेचा वरुण, वायव्येचा वायू, उत्तरेचा कुबेर किंवा सोम आणि ईशान्येचा ईश. या स्वामींनी मग लोकनिर्मिति केली. म्हणून ते मूळ अकरा राजे व बाकी सगळी त्यांची प्रजा. हा सगळा माझाच विस्तार होय, हे तू नीट जाण.
आधी एकच बीज. ते विरूढल्यावर म्हणजे रुजल्यावर त्याचाच बुंधा (खोड) होतो. त्या बुंध्यातून जसजसे अंकुर निघायला लागले तसतसा त्याचा विस्तार वाढायला लागतो. त्या अंकुरांच्या फांद्या होतात. मग त्या फांद्यांनाही लहान-मोठ्या डहाळ्या फुटून त्या पसरतात. त्या डहाळ्यांना मग कोवळी पालवी फुटायला लागते. त्यांची कोवळी पाने होतात. त्या पालवीतून मग फुले, फळे निर्माण होतात. आणि अशा तऱ्हेने वृक्षत्व अस्तित्वात येते. पण पहायला गेले तर त्या वृक्षाच्या त्या सगळ्या विस्ताराला मुळांत एकच ते लहानसे बीज कारणीभूत
असते.
तसेच आरंभाच्या मुळात मीच एक तत्व! ते मनाला जन्म देते झाले. तिथूनच सात मुनी आणि चार मनू स-आचार उपजले. त्यांनी लोक-पाळ निर्मिले. त्या लोक-पाळांनी नाना लोक निर्माण केले. आणि त्या लोकांपासून ही सर्व प्रजा उत्पन्न झाली. अशा परीने या सगळ्या विश्वात मीच एक आहे आणि हा दिसतो हा सगळा पसारा खऱ्या अर्थाने माझा एकट्याचाच आहे! पण ज्याला हे पटते, तो भाव-माध्यमातून हे सर्व जाणून घेतो, समजून घेतो.
एतां विभूतिं योगंच मम यो वेत्ति तत्वतः।
सोsविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशय:।। ७।।
सरळ अर्थ : जो पुरुष या माझ्या परमैश्वर्यरूप विभूतीला आणि योगशक्तीला तत्वतः जाणतो (म्हणजे "हा जो काही दृश्यमात्र संसार आहे तो सर्व भगवंताची माया आहे आणि एक वासुदेव भगवानच सर्वत्र परिपूर्ण भरलेला आहे," हे खऱ्या अर्थानं जाणतो) तो पुरुष निश्चल ध्यानयोगद्वारा माझ्यातच ऐक्य भावाने स्थित होतो, यात काहीच संशय नाही.
विस्तृत विवेचन : हे अर्जुना, बुद्ध्यादी जे भाव आहेत त्या सगळ्या, माझ्या विभूती आहेत. त्या हे सगळे जग व्यापून राहतात. म्हणून अगदी ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत अशी कोणतीच वस्तू नाही की जिच्यामध्ये मी भरलेला नाही. ज्याच्यामध्ये ज्ञानाची जागृती पूर्णपणे झालेली आहे, तो हे व्यवस्थित जाणून असतो. त्याच्या लेखी उच्च-नीच भावाचे दु:स्वप्न हे पूर्णतया मावळून गेलेले असते. अशा व्यक्तीला मी आणि माझ्या विभूतींनी व्यापलेले सर्वकाही हे एकच आहे, अशी प्रतीती प्रत्यक्षात आलेली असते. जो भला माणूस अशा नि:संदेह ऐक्य भावाने मनाने मत्स्वरूप झाला आहे, तो खऱ्या अर्थाने कृतार्थ झाला यात तिळमात्र संशय नाही. जो अशा ऐक्य-भावाने माझे भजन करतो त्याच्या भजनातही मीच नांदतो. म्हणून अभेदभक्तियोग हा सदासर्वदा उत्तम. कारण त्यात तन्मय असलेला माझ्यापासून कधीही विलग होत नाही. तो आचरताना जरी अडथळा आला तरी तो सुखावहच असतो!
(क्रमशः)

- मिलिंद कारखानीस
(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल
असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)
मो. ९४२३८८९७६३