मुंबई निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या कामगिरीकडे लक्ष

Story: राज्यरंग- महाराष्ट्र |
2 hours ago
मुंबई निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या कामगिरीकडे लक्ष

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि शिवसेना-भाजपच्या महायुतीपैकी कोणाची सरशी होणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शिवसेना-मनसेच्या युतीची घोषणा केली. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील जागावाटपही निश्चित झाले आहे. मागील महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ तर भाजपने ८२ जागांवर विजय मिळवला होता. गेल्या आठ वर्षांमध्ये भाजपची मुंबईतील ताकद वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू आणि महायुती मुंबईत नेमक्या किती जागा जिंकणार, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आशियातील सर्वांत श्रीमंत मुंबई महापालिकेची निवडणूक चौरंगी होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग असल्याने सत्ता स्थापनेसाठी ११४ जागा आवश्यक आहेत. मुंबईत एकूण २ हजार ५१६ उमेदवार रिंगणात आहेत. मतदान १५ जानेवारी रोजी होणार असून निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर केले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या निकालाबाबत अंदाज वर्तविणारा पहिला सर्व्हे समोर आला आहे. ‘व्होट वाईब इंडिया’ने केलेल्या सर्व्हेनुसार, मुंबई पालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू भाजपला कडवी टक्कर देतील, असा अंदाज आहे. विधानसभा निवडणुकीचा व्होटिंग पॅटर्न कायम राहिल्यास भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला ११४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना उबाठा आणि मनसे ७९ जागांपर्यंत मजल मारू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ५, तर काँग्रेसला १९ जागांवर विजय मिळू शकतो. १० जागा अन्य पक्षांच्या खात्यात जाऊ शकतात. ‘व्होट वाईब इंडिया’च्या सर्व्हेनुसार महायुती सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला आकडा गाठताना दिसत आहे.

मुंबईत ४० टक्के मराठी, २० टक्के मुस्लिम आणि ४० टक्के इतर (गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय) समाज आहे. सध्या भाजप आणि शिंदे शिवसेना युतीला बहुमत दिसत असले तरी ठाकरे बंधू एकत्र आल्याने तयार होणारी ‘भावनिक लाट’ आणि मराठी-मुस्लिम मतांचे एकत्रिकरण झाल्यास मोठा उलटफेर होऊ शकतो.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र, आता काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याने ही मते विभागली जाणार आहेत. बहुसंख्य मते ठाकरे युतीकडे वळली, तरच ते भाजप-शिंदे जोडीला कडवे आव्हान देऊ शकतील. शिंदे यांची शिवसेना किती मराठी मते आपल्याकडे फिरवते, यावरही ठाकरे बंधूंच्या जागांचा आकडा अवलंबून आहे. महापालिका निवडणुकीत मुंबईकरांची पसंती कोण, हे १६ जानेवारी रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

- प्रदीप जोशी