जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे का ?

आज जग युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेय, हे अमेरिकेचेच ‘कर्तृत्व’ आहे यात शंका नाही. या सर्व युद्धजन्य परिस्थितीतून अमेरिकेला बक्कळ पैसा कमावण्याची संधी उपलब्ध होईल, पण युद्ध लढणारे सर्व देश रसातळाला जातील यात शंका नाही.

Story: विचारचक्र |
30th December, 10:27 pm
जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे का ?

इंग्रजी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ‘वसाहतोत्तर जगातील सांस्कृतिक अभ्यास’ (Cultural Studies in Post-colonial world) नावाच्या एका कोर्सला ‘द इनहेरिटर’ नावाची कादंबरी समाविष्ट होती. या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गोष्ट जगातील पहिल्या वसाहतवादाची गोष्ट सांगते. दोन मानवी टोळ्या अर्थात साधे भोळे निएंडरथाल व कावेबाज होमोसेपिअन यांच्यातला हा संघर्ष शेवटी होमो सेपिअनचा विजय आणि निएंडरथाल्सचा समूळ अंत याने या संघर्षाचा अंत होतो. जरी हे युद्ध एकतर्फी असलं तरीही यामुळे आंतरमानवीय संघर्षाची ठिणगी पडते व यातून वसाहतवादाच्या संकल्पनेचा जन्म होतो, असा या कादंबरीचा सारांश आहे. बाहेरील देशातून येऊन परकीय भूमीवर आक्रमण करून तिथली भूमी व प्रजा यावर नियंत्रण, सत्ता हस्तगत केलेल्या भूभागाचे सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय शोषण तसेच या शोषणातून संपत्तीनिर्मिती असा हा वसाहतवादाचा क्रूर चेहरा आजतागायत जगाने पाहिला आहे. आजचं जग जरी या पारंपरिक वसाहतवादापासून मुक्त असले तरीही आर्थिक वसाहतवादाने अजूनही गरीब व कमकुवत देशांना आपल्या विळख्यातून सोडलेले नाही. 

गेली तीन वर्षे सुरू असलेले युक्रेन-रशिया युद्ध, गेली दोन वर्षे इस्रायलचा गाझापट्टीत वाढलेला नृशंस युद्धराग, गेल्या सहामाहीत सुरू झालेलं थायलंड-कंबोडिया युद्ध, गेल्या एप्रिल मेमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील धुमश्चक्रीतून भारताने केलेलं ‘ऑपरेशन सिंदूर’, तैवानला गिळायला आ वासून बसलेला चीन, भारत व बांगलादेश यांच्यातील वाढता राजकीय तणाव व या सगळ्यात शस्त्रास्त्र कंपन्यांचा अमेरिकेवर वाढता दबाव या सर्व घडामोडी लक्षात घेता संपूर्ण जग आता तिसऱ्या निर्णायक महायुद्धाच्या उंबरठ्यावर तर येऊन ठेपले नाही ना, असा संशय व्यक्त होताना दिसून येतो. आश्चर्य म्हणजे या सर्व रणधुमाळीत तालिबान नावाचा राक्षस पाकिस्तानचे वाढते हल्ले जेवढ्यास तेवढे प्रत्युत्तर देऊन परतवून लावतोय व आपल्या देशाच्या परिस्थितीचे थोडे गांभीर्य ओळखून लक्षात घेऊन सावकाशपणे पावले टाकताना आपल्याला दिसून येतो. 

पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी व नंतर तसेच दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी अस्तित्वात असलेली भीषण सामरिक युद्धजन्य परिस्थिती आजही वर्तमान काळात प्रचलित झालेली आपल्याला दिसून येते.  ही परिस्थिती एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून हळूहळू मूळ धरू लागली व वाढत्या एकाहून अधिक आर्थिक महासत्तांमुळे बहुध्रुवी होत चाललेलं जग याचाही या परिस्थितीवर प्रभाव पडत गेला. आज अमेरिका जरी एकमेव आर्थिक महासत्ता नसली तरीही एकमेव लष्करी महासत्ता आहे, हे विसरून चालणार नाही. या सर्व युद्धजन्य परिस्थितीत अमेरिका नावाच्या देशांतर्गत लोकशाहीवादी पण जागतिक पटलावर युद्धखोर असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या महासत्तेचा उल्लेख अत्यावश्यक आहे. कारण जगात जिथे जिथे युद्ध चालू झाले होते व आहे तिथे तिथे अमेरिकेचा हस्तक्षेप हा असतो व यात आता कोणतेही नवल राहिलेले नाही. 

युक्रेन, तैवान, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, हे सर्व देश या ना त्या कारणाने अमेरिकेच्या कारस्थानामुळे किंवा विश्वासघातामुळे किंवा आर्थिक मदतीमुळे युद्धात पडले किंवा ओढले गेले व याचा परिणाम म्हणून आपल्याला आज या देशांमध्ये अस्थिरता निर्माण झालेली दिसून येते. सध्याची सर्वात ताजी युद्धवार्ता अमेरिकेने व्हेनेझुएला या देशाच्या जहाजांवर केलेला हवाई हल्ला व या अमेरिकन धाकदपटशाला बळी पडलेला हा देश काही दिवसांतच रसातळाला पोहोचला आहे. 

या सर्व युद्धकारणात अमेरिकेला इतका का बरं रस असतो? प्रत्येक देशाच्या राजकारणात, अंतर्गत गृहकलहात, तिथली सरकारं उलथवण्यात इतकंच नव्हे तर आपल्याला हवं ते सरकार तिथे सत्तेत आणण्याइतपत अमेरिका का बरं लुडबुड करते? यातून अमेरिकेला काय सिद्ध करायचं असतं?

जगात जेवढे म्हणून देश आहेत तेवढ्या देशांवर अमेरिकेला नियंत्रण ठेवायचे आहे. हे देश जेवढे नियंत्रित, विस्कळीत, अस्थिर व संकटग्रस्त राहतील तेवढा अमेरिकेचा फायदा होईल. कोणत्याही देशात अंतर्गत बंडाळी माजवणं, तिथं युद्ध घडवून आणणं, आपल्याला अनुकूल असलेली सरकारं त्या देशात आणण्यासाठी आपली गुप्तचर यंत्रणा सतत कामाला लावणं, यासारख्या उचापती अमेरिका वरचेवर करत असते. 

१९९१ साली सोव्हिएत युनियनचे विघटन होऊन त्यातून जे सोळा देश जन्माला आले, त्यातला युक्रेन हा एक देश. युक्रेन हा अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या नाटो संघटनेचा सदस्य व्हावा अशी अमेरिकेची खेळी होती. पण नाटो मार्फत व युक्रेनमार्फत अमेरिका रशियाच्या अगदी अंगणात येऊन ठेपली असती व रशियाला हे कधीच मान्य झाले नसते किंबहुना यातून रशिया या देशाला कायमस्वरुपी धोका निर्माण झाला असता‌. आपल्या शेजारी नाटो सदस्य देश म्हणजे आपण अमेरिकेला घरात प्रवेश देण्यासारखे होईल याची रशियाला जाणीव झाली व याचे रूपांतर यथावकाशपणे युद्धात झाले. तैवानला साम्राज्यवादी चीन गिळू पाहतोय व अमेरिका चीनला विरोध करतेय एवढीच काय ती अमेरिकेची सकारात्मक बाजू आपल्याला दिसून येते, पण यात अमेरिकन युद्धमाफिया व शस्त्रास्त्र कंपन्या नसतीलच असं म्हणणं धाडसाचं ठरेल. 

बांगलादेशच्या ताब्यातील सेंट मार्टिन्स बेटांवर अमेरिकेला लष्करी तळ उभारायचा आहे व यात भारत समर्थक शेख हसीना सरकार हा सगळ्यात मोठा अडथळा होता. शेख हसीना प्रचंड अत्याचारी होत्या हे जरी खरं असलं, तरीही अमेरिकेने सेंट मार्टिन्स बेटांवर लष्करी तळ उभारण्यास त्यांचा विरोध होता व ही भारतासाठी सकारात्मक बाब होती. पण शेख हसीना यांची राजवट, तिथलं विद्यार्थी आंदोलन, जमात ए इस्लामी सारखी कट्टरपंथी संघटना तसेच पडद्यामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय व अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए यांच्या हालचालींनी बांगलादेशात गृहकलह झाला व शेख हसीनांचं सरकार उलथवलं गेलं. असे अनेक अयशस्वी प्रयत्न भारतातही झाले, पण भारतात अशा प्रयत्नांना यश आले नाही. 

जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जर युद्ध चालू असेल तर त्यात अमेरिका नसेल असे होणे अशक्य आहे. अंकल सॅमला सर्व ठिकाणी नाक खुपसायचे असते व आपला वरचष्मा ठेवायचा असतो. आज जग युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय, हे अमेरिकेचेच ‘कर्तृत्व’ आहे यात शंका नाही. या सर्व युद्धांतून व युद्धजन्य परिस्थितीतून अमेरिकेला बक्कळ पैसा कमावण्याची संधी उपलब्ध होईल, पण युद्ध लढणारे सर्व देश रसातळाला जातील यात शंका नाही. 


प्रा. विघ्नेश शिरगुरकर

(लेखक कथालेखक, अनुवादक 

आणि कवी आहेत.)