दक्षिण झेडपीचे अध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई : राज्य सरकारकडे करणार पाठपुरावा

मडगाव : राज्य सरकारकडून आवश्यक विकास निधी याआधी मिळालेला आहे व अनेक कामे गेल्या पाच वर्षांत केलेली आहेत. आरडीएचा निधी मिळावा व निधीत दुप्पट वाढ होण्यासह अधिकारही मिळावेत, यासाठी राज्य सरकार व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल, असे दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे (South Goa Zilla Panchayat) नूतन अध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई (Siddharth Gauns Dessai) यांनी सांगितले.
दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्षपदी सिद्धार्थ देसाई यांची निवड झालेली असून भाजप, मगो व अपक्ष अशी १५ मते असतानाही विरोधातील एक मत मिळवून हा विजय मिळवला. याबाबत बोलताना ते म्हणाले की, जिल्हा पंचायत अध्यक्ष पदासाठी झालेली निवडणूक ही गुप्त मतदानाने झालेली आहे. त्यामुळे विरोधकांपैकी कोणी क्रॉस वोटिंग केले हे समजणे शक्य नाही. मात्र या निकालातून विरोधकांचाही आपणावर व भाजपवर विश्वास आहे, हेच दिसत आहे. जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणून कारभार पाहताना सर्व सदस्यांची बैठक झाल्यावर त्यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर पुढील विकासकामांंबाबतचे व कामकाजाबाबतचे निर्णय घेण्यात येतील. सर्व सदस्य मतदारसंघात फिरलेले असून लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. त्यांच्याकडून आलेल्या प्रस्तावानुसार पुढील कामांचे नियोजन होईल.
जिल्हा पंचायत सदस्यांना अधिकार मिळावेत ही सर्वांचीच इच्छा आहे. मागील पाच वर्षांत मिळालेल्या विकासनिधीतून प्रत्येक सदस्याने आपापल्या मतदारसंघात विकासकामे केलेली आहेत. गेल्या वेळीही जिल्हा पंचायत सदस्यांना अधिकार मिळावेत, यासाठी प्रयत्न केले होते. आता ‘आरडीए’मधून जास्त निधीसह सदस्यांना अधिकार मिळावेत, यासाठीही प्रयत्न करणार आहे. याबाबत राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यामुळे जिल्हा पंचायत सदस्यांना अधिकार मिळावेत यासह निधीतही दुप्पट वाढ व्हावी, यासाठी नव्याने प्रस्ताव राज्य सरकारकडे करण्यात येईल, असेही देसाई म्हणाले.
दक्षिण गोवा जिल्हा भवनासाठी प्रयत्न!
दक्षिण गोवा जिल्हा भवनाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही यावर विचारणा केली असता, दक्षिण गोवा जिल्हा भवन व्हावे यासाठी मागील पाच वर्षांच्या कालावधीतही सातत्याने प्रयत्न केले होते. मात्र प्रत्येकवेळी जागेचा प्रश्न निर्माण झाला. जागा उपलब्ध झाल्यास पार्किंगचा प्रश्न निर्माण होत असे. त्यामुळे जिल्हा भवन उभारण्याचे काम मार्गी लागले नाही. या आधीच्या जिल्हा पंचायत सदस्यांकडून जिल्हा भवनसाठी एक जागा निश्चित करण्यात आली होती. त्या जागेचा प्रस्ताव पुढे करून जिल्हा भवन उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. त्या ठिकाणी शक्य झाल्यास मुख्यमंत्र्यांशी त्याबाबत चर्चा केली जाईल व या पाच वर्षांत जिल्हा भवन उभारणीचा प्रयत्न होईल, असे गावस देसाई यांनी सांगितले.
पक्षाचा आदेश शिरोधार्ह!
मागील पाच वर्षांच्या कालावधीत भाजपने तीन अध्यक्ष नेमले होते, यावेळीही त्याचप्रमाणे काही होणार का, यावर बोलताना सिद्धार्थ गावस देसाई यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही कार्य करतो. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत उपाध्यक्ष म्हणून मला संधी देण्यात आली होती. यावेळी दुसऱ्यांदा निवडून आल्यावर अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाने घेतलेला निर्णय हा अंतिम असेल. अगदी उद्याही पदाचा राजीनामा द्यायला सांगितल्यास आपण तो तत्काळ देऊ.