
बेळगाव : कर्नाटकातून (Karnatak चोर्ला घाट (Chorla Ghat) मार्गे गोव्याकडे (Goa) शहाळ्यांची वाहतूक करणारी महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन आज मंगळवारी ३० डिसेंबर रोजी पहाटे सुमारे ४ वाजता अपघातग्रस्त (Accident) होऊन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चोर्ला घाटातील एका मोठ्या वळणावर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने वाहनातील शहाळ्यांचा भार एका बाजूला सरकला आणि वाहन पलटी झाले. पलटी झाल्यानंतर डिझेल गळतीमुळे वाहनाने अचानक पेट घेतला आणि संपूर्ण पिकअप जळून खाक झाली. अपघाताच्या वेळी घाट परिसरात दाट धुके पसरलेले होते, त्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज येऊ शकला नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
या आगीत वाहनासह शहाळ्यांचे मिळून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल झाले असून, किनारपट्टी भागात शहाळ्यांना मोठी मागणी आहे. याच मागणीसाठी कर्नाटकातून गोव्यात शहाळ्यांची वाहतूक केली जात होती. सदर शहाळ्यांची वाहतूक कर्नाटक राज्यातील वाहन क्रमांक केए-३४ सी-५१६७, मालक सचिन मरिअप्पा यांच्या पिकअप वाहनातून केली जात होती. अपघातानंतर शहाळे रस्त्यावर विखुरले गेले असून आग लागून वाहन पूर्णतः नुकसानग्रस्त झाले.