विजय सरदेसाईंनी घेतली कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट

म्हादई प्रश्नावरून गोवा सरकारवर विजय यांची टीका

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
28 mins ago
विजय सरदेसाईंनी घेतली कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट

मडगाव : दक्षिण गोव्याच्या दौऱ्यावर आलेले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी भेट घेतली. बाणावली येथील 'ताज एक्झोटिका' हॉटेलमध्ये रविवारी रात्री ही भेट झाली. या भेटीत आगामी निवडणुका आणि म्हादईच्या संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा झाली. 

या भेटीबाबत माहिती देताना विजय सरदेसाई म्हणाले की, डी. के. शिवकुमार यांच्याशी जुनी ओळख असल्याने ही सदिच्छा भेट होती. मात्र, दोन राजकारणी भेटल्यानंतर सहाजिकच राजकीय विषयांवर चर्चा झाली. यामध्ये गोव्याच्या हिताचे मुद्दे आणि सद्य राजकीय परिस्थितीवर आम्ही विचारविनिमय केला.

म्हादई प्रश्नी सरकार गंभीर नाही!

 या भेटीदरम्यान म्हादई पाणी वाटपाच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. यावरून त्यांनी गोवा सरकारवर जोरदार टीका केली. सरदेसाई म्हणाले की, म्हादई प्रश्नी गोवा सरकार गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे. २०१९ पासून गेल्या सहा वर्षांत या प्रकरणी ठोस निर्णय होईल अशी एकही सुनावणी झालेली नाही. जर अशी सुनावणी झाली असेल, तर मुख्यमंत्र्यांनी त्यातील मुद्दे जनतेसमोर मांडावेत. कर्नाटक सरकार आपली बाजू ठामपणे मांडत असताना, गोवा सरकार मात्र न्यायालयात खटला ताकदीने लढण्यास कमी पडत आहे.

ते पुढे म्हणाले की, म्हादईच्या प्रश्नावर आम्ही नेहमीच गोव्याच्या बाजूने राहू, कर्नाटकच्या नाही. मात्र, राज्य सरकारने न्यायालयात अधिक आक्रमकपणे आपली बाजू मांडणे आणि सुनावणी वेळेवर व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

हेही वाचा