
मडगाव: दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक होत असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे सिद्धार्थ गावस देसाई, तर काँग्रेसकडून लुईझा रॉड्रिग्ज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून अंजली अर्जुन वेळीप आणि गोवा फॉरवर्डतर्फे इनासिना पिंटो यांच्यात लढत होणार आहे.

राज्यात २० डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल २२ डिसेंबरला जाहीर झाला. दक्षिण गोव्यात २५ पैकी ११ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे, काँग्रेसने ८ (ज्यात ७ जागा सासष्टीतील आहेत) आणि गोवा फॉरवर्डने १ अशा एकूण ९ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने मित्रपक्ष मगो (३ जागा) आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता राखण्याचा दावा केला आहे.

भाजपने झेडपीवर सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले शेल्डेचे सिद्धार्थ देसाई आणि बार्सेच्या अंजली वेळीप यांना संधी दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल सायंकाळी दक्षिण गोवा झेडपी अध्यक्षपदासाठी सिद्धार्थ देसाई तर उपाध्यक्षपदासाठी अंजली वेळीप यांच्या नावाची घोषणा केली होती. आज सकाळी त्यांनी अर्ज भरला. यावेळी माजी खासदार विनय तेंडुलकर व शर्मद रायतूरकर उपस्थित होते.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी ३ आणि उपाध्यक्षपदासाठी ३ अर्ज प्राप्त झाले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी स्पष्ट केले की, जरी संख्याबळ कमी असले तरी भाजपला ही निवडणूक सहजासहजी जिंकू देणार नाही, या उद्देशाने काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युतीने आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.