भाजपकडून सर्वाधिक हरकती; १५ जानेवारीपर्यंत मुदत

पणजी : विशेष मतदार यादी पडताळणी (SIR) मोहिमेअंतर्गत निवडणूक आयोगाकडे (Election Commission) विविध राजकीय पक्षांकडून एकूण २,८२१ हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर आता सुनावणी घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. हरकती सादर करण्यासाठी नागरिकांना आणि राजकीय पक्षांना १५ जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे.मतदार यादीच्या मसुद्यावर राजकीय पक्षांनी घेतलेल्या हरकतींची आकडेवारी पाहिल्यास भाजपच्या सर्वाधिक १,५७४ हरकती आल्या आहेत. त्यानंतर काँग्रेस १,०३५, रिव्होल्युशनरी गोअन्स (आरजी) १७०, गोवा फॉरवर्ड ४२ हरकती आल्या असून, विशेष म्हणजे आम आदमी पक्ष (आप) आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगोप) यांच्याकडून एकही हरकत नोंदवण्यात आलेली नाही. तसेच बहुजन समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षांकडूनही हरकतींची संख्या शून्य आहे.
राजकीय पक्षांनी या हरकती १७ ते २७ डिसेंबर या कालावधीत सादर केल्या आहेत. इतर राज्यांसह गोव्यात ही 'एसआयआर' मोहीम ४ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्यात आली होती. मतदारांनी अर्ज सादर केल्यानंतर आता मतदार यादीचा मसुदा तयार झाला आहे. १५ जानेवारीपर्यंत हरकती स्वीकारल्या जातील आणि त्यानंतर निवडणूक आयोग यावर अंतिम निर्णय घेईल.