दक्षिणेत अकरा महिन्यांत ८१ अपघाती मृत्यू

गेल्यावर्षीपेक्षा १२ प्रकरणे वाढली : एकूण २०८ अपघाताची प्रकरणे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29 mins ago
दक्षिणेत अकरा महिन्यांत ८१ अपघाती मृत्यू

मडगाव : दक्षिण गोवा पोलिसांनी जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ८१ अपघाती मृत्यूच्या प्रकरणांची नोंद केली आहे. गेल्यावर्षी या कालावधीत ६९ अपघाती मृत्यूची प्रकरणे घडली होती. यावर्षी १२ अपघाती मृत्यू प्रकरणांत वाढ झाल्याचे दिसून येते.

दक्षिण गोवा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या परिक्षेत्रात मागील अकरा महिन्यांच्या कालावधीत एकूण २०८ अपघातांच्या प्रकरणांची नोंद आहे. गेल्यावर्षी या कालावधीत १९२ अपघात प्रकरणांची नोंद होती. यावर्षी १६ प्रकरणे वाढलेली आहेत. गेल्यावर्षी अपघाती मृत्यूची ६९ प्रकरणे नोंद होती व ६७ प्रकरणांत संशयितांवर कारवाई झाली होती. यावर्षी अपघाती मृत्यूच्या प्रकरणात वाढ झाली आहे. यावर्षी ८१ प्रकरणे नोंद असून त्यातील ८० प्रकरणांतील संशयितांवर दक्षिण गोवा जिल्हा पोलिसांनी कारवाई केली आहे. तर, इतर गंभीर जखमी होण्याच्या १२७ अपघात प्रकरणांची नोंद झाली असून त्यातील ११८ प्रकरणांत संशयितांवर कारवाई झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी अपघाताच्या प्रकरणांसह अपघाती मृत्यूच्या संख्येतही वाढ झाली आहे. यामुळे रस्ता सुरक्षा नियमांचे योग्य पालन चालकांकडून होत नसल्याचे दिसून येत आहे. दक्षिण गोवा जिल्हा पोलिसांकडून शाळा, महाविद्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात. वाहनचालकांना समज देण्यासह दंडात्मक कारवाईवरही भर देण्यात आला आहे. पोलिसांकडून आवश्यक काळजी घेण्यात येत असतानाही वाढणार्‍या अपघाती मृत्यूची संख्या चिंताजनक आहे.

वाहन नियमांचे उल्लंघन, १४१७७ जणांवर कारवाई

दक्षिण गोव्यात वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रक़रणी सहा महिन्यांत १४१७७ जणांवर दंडात्मक कारवाई केली. कोटपा कायद्यांतर्गत २,५९३ जणांवर, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्‍या ३,३३७ जणांवर तर कचरा टाकणार्‍या ३,५६९ जणांवर दक्षिण गोवा पोलिसांनी कारवाई केली आहे.