राज्यात यंदा ७८.४५ कोटींचे २३३ किलो ड्रग्ज जप्त

३२ विदेशींसह २०६ जणांना अटक : गोवा पोलिसांची कामगिरी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th December, 11:36 pm
राज्यात यंदा ७८.४५ कोटींचे २३३ किलो ड्रग्ज जप्त

म्हापसा : गोवा पोलिसांनी राज्यातील ड्रग्ज तस्करीला आळा घालण्याच्या उद्देशाने यंदा छापेमारी करीत १५९ गुन्हे नोंद केले. यामध्ये ७८.४५ कोटी रुपयांचे सुमारे २३३.५६३ किलो अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी ३२ विदेशी नागरिकांसह एकूण २०६ संशयितांना अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत गोवा पोलिसांच्या विविध विभागांकडून १५९ ड्रग्ज प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले. या कारवाईत एकूण २३३ किलो ५६३.४७२ ग्रॅम ड्रग्ज जप्त केला. जप्त ड्रग्जची किंमत ७८ कोटी ४५ लाख ४३ हजार ३६२ रुपये आहे.

उत्तर गोवा पोलिसांनी सर्वाधिक ७५ गुन्हे नोंद केले आहेत. यामध्ये १ कोटी ८५ लाख ९१ हजार ८०० रुपयांचा ८४ किलो ४४७.२६० ग्रॅम ड्रग्ज जप्त केला. दक्षिण गोवा पोलिसांनी ३६ गुन्हे नोंदवले. यामध्ये ५४ लाख ९८ हजार २५० रुपयांचा ४ किलो ४२ किलो ५१.०५ ग्रॅम ड्रग्ज जप्त केला.

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (एएनसी) २८ गुन्हे नोंद केले. यामध्ये १८ कोटी १० लाख ७० हजार २८४ रुपयांचा ३२ किलो ६७१.२२ ग्रॅम मादक पदार्थ हस्तगत केला. गुन्हा शाखेने १९ गुन्हे नोंदवत ५७ कोटी ८५ लाख ६४ हजार ६२८ रुपयांचा ६६ किलो २०९.९४२ ग्रॅम ड्रग्ज हस्तगत केला. कोकण रेल्वे पोलिसांनी १ गुन्हा नोंदवून ८ लाख १८ हजार ४०० रुपयांचा ८ किलो १८४ ग्रॅम ड्रग्ज जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी २०६ जणांना अटक केली. यात ३२ विदेशी नागरिक, १०२ परप्रांतीय तर ७२ स्थानिकांचा समावेश आहे. उत्तर गोवा पोलिसांनी ७५ गुन्ह्यांमध्ये ८५ जणांना अटक केली असून यामध्ये १२ विदेशी, ४५ परप्रांतीय व २८ स्थानिकांचा समावेश आहे.

दक्षिण गोवा पोलिसांनी ३९ गुन्ह्यांमध्ये ४९ जणांना अटक केली. त्यात २२ स्थानिक, २६ परप्रांतीय तर एक विदेशी नागरिक आहे.

एएनसीने २९ गुन्ह्यांतून ४१ जणांना अटक तेली. त्यात १० विदेशी नागरिकांसह १७ स्थानिक व १४ परप्रांतीय नागरिकांचा समावेश आहे. गुन्हा शाखेने १९ गुन्ह्यांमध्ये ३० जणांना अटक केली. त्यात ९ विदेशी, १६ परप्रांतीय तर ५ गोमंतकीयांचा समावेश आहे. कोकण रेल्वे पोलिसांनी नोंदवलेल्या एकमेव गुन्ह्यात एका परप्रांतीय नागरिकाचा समावेश आहे.

अटक केलेल्यांमध्ये सर्वाधिक विदेशी नायजेरियन

अटक केलेल्यांमध्ये ३२ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. यात नायजेरियन १०, घाना १, रशियन २, नेपाळ ५, झिंम्बावे १, जपान १, जर्मन २, इस्त्रायल १, स्वीडन ३, फ्रेंच १, लिबेरीयन १, कॅमरियन ४.


हेही वाचा