म्हापसा जलस्रोत कार्यालय पर्वरी येथे नेल्याने तीव्र नाराजी

आदेशाविनाच अधिकाऱ्यांची मनमानी : पाच मतदारसंघांतील लोकांची गैरसोय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th December, 11:39 pm
म्हापसा जलस्रोत कार्यालय पर्वरी येथे नेल्याने तीव्र नाराजी

म्हापसा येथील पेयजल पुरवठा इमारतीवर जलस्रोत खात्याचे कार्यालय पर्वरीत स्थलांतर झाल्याचे चिकटवलेली नोटीस.

म्हापसा : जलस्रोत खात्याने (Water Resources Department) म्हापसा (Mapusa) येथील आपले कार्यालय अचानक पर्वरीतील सिंचन भवनमध्ये (Irrigation Bhavan in Parvari) स्थलांतरित केल्याने बार्देश तालुक्यातील जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही अधिकृत स्थलांतर आदेशाशिवाय आणि सार्वजनिक सूचना न देता हे कार्यालय हलवण्यात आल्याने बार्देश तालुक्यातील म्हापसा, थिवी, हळदोणा, शिवोली व कळंगुट या पाच मतदारसंघांतील लाभार्थींना आता वाहतूक कोंडीचा अडथळा पार करून पर्वरी गाठावे लागत आहे.
म्हापसा कदंब बस स्थानकाजवळील पेयजल पुरवठा इमारतीत हे कार्यालय २०१२ पासून कार्यरत होते. बस स्थानकाजवळ असल्याने सर्वसामान्यांना ते सोयीचे होते. मात्र, १५ दिवसांपूर्वी सुट्टीच्या दिवशी कोणतीही पूर्वकल्पना न देता हे कार्यालय पर्वरीत नेण्यात आले. पेयजल खात्याने इमारतीच्या नूतनीकरणासाठी जागा रिकामी करण्याची विनंती केली होती, परंतु पर्यायी व्यवस्था म्हणून करासवाडा येथील काडा (सीएडीए) इमारतीचा विचार सुरू असताना अचानक हे कार्यालय पर्वरीत हलवण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी हे स्वतः पर्वरी परिसरात वास्तव्यास आहेत. करासवाडा येथे कार्यालय नेण्याऐवजी त्यांनी आपल्या वैयक्तिक सोयीसाठी पूर्ण कार्यालयच पर्वरीत हलवल्याची चर्चा खात्यात सुरू आहे. यामुळे नितळ गोंय योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांच्या अनुदानासाठी येणाऱ्या शेतकरी आणि गरजूंना आता नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतूक कोंडीचा मोठा अडथळा
सध्या पर्वरी उड्डाणपुलाचे काम सुरू असून म्हापसा तसेच बार्देश तालुक्यातील इतर भागांतील लोकांना पर्वरीमध्ये जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पुढील दोन महिने या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी सरकारने महामार्गचा काही पट्टा तसेच बायपास रस्ता बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. अशा स्थितीत जलस्रोत खात्याचे म्हापसा कार्यालय पर्वरीत नेल्याने या कार्यालयात ये-जा करण्यासाठी लाभार्थी लोक तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

विना स्थलांतर आदेश हे कार्यालय म्हापशातून पर्वरीत नेण्यामागचे कारण काय ? जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी यात लक्ष घालून बार्देशवासीयांची ही गैरसोय दूर करावी.
- अॅड. महेश राणे, शेतकरी 

हेही वाचा