दक्षिण गोव्यात अकरा महिन्यांत १३ खून, ३८ बलात्कार

७८८ प्रकरणांपैकी ६७२ प्रकरणांचा तपास : गंभीर गुन्ह्यांचा ९५ टक्के तपास

Story: अजय लाड। गोवन वार्ता |
27th December, 11:41 pm
दक्षिण गोव्यात अकरा महिन्यांत १३ खून, ३८ बलात्कार

मडगाव : दक्षिण गोवा पोलिसांनी १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर या कालावधीत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली ७८८ गुन्हे दाखल करत ६७२ गुन्ह्यांचा तपास लावला. तपासाचे हे प्रमाण ८५.२८ टक्के असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यात दोन टक्क्यांनी घट आहे. १३ खून, ३८ बलात्कार यासह ६७ गंभीर गुन्ह्यांपैकी ६४ गुन्ह्यांचा तपास करण्यात आला असून हे प्रमाण ९५.५२ टक्के राहिले. घरफोड्या, वाहन चोर्‍या व अन्य प्रकारचा चोर्‍यांचा तपास लावण्याचे प्रमाण ६१.८७ टक्के एवढे आहे.

दक्षिण गोव्यात वरील कालावधीत १३ खून, १० खुनाचा प्रयत्न, ४ सदोष मनुष्यवधाचा, दरोड्याची ३ तर ३८ बलात्कारांची मिळून ६७ गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. यातील तीन बलात्कार प्रकरणे वगळता इतर गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळाले. ५ चोर्‍या, भरदिवसा १६ चोर्‍या, रात्रीच्या वेळी ४४ चोर्‍या, घरफोडी १५, वाहन चोर्‍या ४१, सोनसाखळी हिसवणे ८ तर मोबाईल व अन्य प्रकारच्या ३१ चोर्‍या मिळून वरील कालावधीत १६० चोर्‍यांची नोंद झाली आहे. यातील ९९ चोर्‍यांचा तपास लावण्यात आला. या प्रकारच्या गुन्ह्यांमुळे तपासाची टक्केवारी कमी झाली आहे.

वरील कालावधीत फसवणुकीचे ५८ गुन्हे दाखल झाले असून ४९ गुन्ह्यांचा तपास लागला. विश्वासघात केल्याप्रकरणी १३ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील ९ गुन्ह्यांचा तपास लावला आहे. गोंधळ घालण्याचे १३ प्रकार घडले व सर्व प्रकारात दोषींवर कारवाई झाली. मारहाणीत जखमी करण्याचे ६६ गुन्हे दाखल असून ६४ प्रकरणांत संशयितांवर कारवाई झाली. याशिवाय भारतीय न्याय संहितेच्या इतर कलमांनुसार १३४ प्रकरणांची नोंद असून त्यातील १०९ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे.

दरोड्याच्या तिन्ही प्रकरणांत संशयित गजाआड

दक्षिण गोव्यात मागील अकरा महिन्यांच्या कालावधीत लैंगिक अत्याचाराची ३८ प्रकरणे नोंद असून त्यातील ३५ प्रकरणातील संशयितांवर कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्यावर्षी या कालावधीत ३७ प्रकरणे घडलेली होती. यावर्षी दरोड्याची तीन प्रकरणे घडली असून तिन्ही प्रकरणांत संशयितांना गजाआड करण्यात आले. तसेच अपहरणाची ३१ प्रकरणे घडली असून त्यातील २८ प्रकरणात संशयितांवर कारवाई झाली. गेल्यावर्षीपेक्षा अपहरणांच्या प्रकरणांत कमी आली आहे.

गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न

दक्षिण गोवा पोलिसांनी पोलीस नियंत्रण कक्ष आणि पोलीस स्थानकाच्या वाहनांची तसेच स्थानिक गुप्तचर विभागाच्या कर्मचार्‍यांची गस्त वाढवली आहे. या व्यतिरिक्त गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची वेळोवेळी चौकशी करण्यात येत आहे. तसेच भाडेकरू तसेच इतर संशयास्पदरीत्या फिरणार्‍यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. यामुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात कमी आली आहे. 


हेही वाचा