
डिचोली : तालुक्यातील बंदरवाडा परिसरात, बसस्थानकाच्या मागील बाजूस एका इमारतीखाली पार्क करून ठेवलेल्या उघड्या जीपमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या नाकावर जखम असल्याने तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मृत महिला सुमारे ५५ वर्षांची असून तिचे नाव लक्ष्मी शिरोडकर असे असल्याचे समजते. ती मूळची तळेवाडा, माटणे येथील रहिवासी असून सध्या डिचोली परिसरात वास्तव्यास असल्याचे सांगण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सदर महिला या परिसरात नेहमी फिरत असे. घटनेच्या रात्री तिचा या ठिकाणी एका व्यक्तीसोबत वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तिच्या नाकाला गंभीर स्वरूपाची जखम आढळून आल्याने मृत्यू नैसर्गिक नसून घातपात झाल्याचा संशय बळावला आहे.
या घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलीस निरीक्षक विजय राणे व त्यांच्या पथकासह उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीदेवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून फॉरेन्सिक पथकानेही तपास करून पुरावे संकलित केले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवचिकित्सा अहवालाची प्रतीक्षा असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूमागील गूढ उलगडण्याची शक्यता आहे.