जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला बहुमत, तर लुथरा बंधूंंची कोठडीत रवानगी

पणजी : जिल्हा पंचायत निवडणूक शांततेत पार पडली. उत्तर गोव्यात २५ पैकी १८ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. तर दक्षिण गोव्यात ११ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. दरम्यान, बर्च आग दुर्घटना प्रकरणी लुथरा बंधू व सहकाऱ्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली. तसेच राज्यात चोरी, अपघाताच्या घटना घडल्या. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार

उतोर्डा येथील ‘जॅमिंग गोट’ शॅक्स पहाटे लागलेल्या आगीत खाक
उतोर्डा येथील ‘जॅमिंग गोट’ शॅक्सला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. वेर्णा आणि मडगाव अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. गेल्या आठवड्यातच या शॅक्सचे बेकायदा बांधकाम हटवण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले होते.
अपघातात जखमी पत्नीनंतर पतीचाही मृत्यू
गोवा वेल्हा येथील पेट्रोल पंपाजवळ ३ नोव्हेंबर रोजी सकाळी यामाहा मोटारसायकल आणि हिरो होंडा अॅक्टिव्हामध्ये अपघात झाला होता. अपघातात जखमी झालेल्या नेवरा येथील दुचाकी चालक साजू नाईक (७८) यांचे उपचारादरम्यान गोमेकाॅत निधन झाले आहे. दरम्यान, याच अपघातात जखमी झालेले साजू नाईक यांची पत्नी संगीता नाईक (७१) हिचे ५ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते.
सोमवार

उत्तरेत भाजपचे वर्चस्व, दक्षिणेत बहुमतासाठी कसरत
गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत विरोधकांची मते विभागली गेल्याचा थेट फायदा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (भाजप) झाला आहे. काही जागांवर अत्यल्प मतांच्या फरकाने भाजप उमेदवारांनी विजय मिळवल्याने दोन्ही जिल्हा पंचायतींवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकला आहे. उत्तर गोव्यात २५ पैकी १८ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर दक्षिण गोव्यात ११ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून मगो आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर तिथेही भाजप सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा पंचायतीत २० मतदारसंघांत ‘महिला राज’
राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या महिला उमेदवारांचे प्रमाण ४० टक्के इतके राहिले आहे. या निवडणुकीत सर्वाधिक महिला उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे, महिलांसाठी राखीव नसलेल्या हळदोणा मतदारसंघातून काँग्रेसच्या मॅरी मिनेझीस यांनी विजय मिळवत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
मंगळवार
सहा वर्षीय बालिकेवर स्कूल व्हॅन चालकाचा लैंगिक अत्याचार
बार्देश तालुक्यातील एका ६ वर्षीय बालिकेवर मुलांना शाळेत ने-आण करणाऱ्या खासगी वाहन चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी संशयित आरोपी अल्लाबक्ष सय्यदाबादे उर्फ बक्षी (४६, रा. अंगणवाडीनगर, पर्वरी) याला अटक केली.

रोमिओ लेनच्या अजय गुप्ताला म्हापसा पोलिसांकडून अटक
बर्च बाय रोमिओ लेन क्लबसाठी अबकारी खात्याचा परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचे बनावट नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) वापरल्याप्रकरणी रोमिओ लेन वजा जीएस हॉस्पिटॅलिटी एलएलपी या कंपनीचे सहमालक अजय गुप्ता यांना म्हापसा पोलिसांनी अटक केली.
बुधवार

अमित पालेकरांची ‘आप’ संयोजक पदावरून उचलबांगडी
जिल्हा पंचायत निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आम आदमी पक्षाने (आप) गोवा संयोजक अमित पालेकर यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी राज्याचे संघटन सरचिटणीस श्रीकृष्ण परब यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.
कळंगुटमध्ये साडेचार लाखांचे मेथाम्फेटामाइन ड्रग्ज जप्त
परबोवाडा कळंगुट येथे पोलिसांनी छापा टाकून ४ लाख ५० हजारांचा ४५.३ ग्रॅम मेथाम्फेटामाइन हा ड्रग्ज जप्त केला. याप्रकरणी संशयित आरोपी विष्णू श्याम हरमलकर (३६, रा. सातारशेत, हळदोणा) याला अटक केली.
जुना फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन २५.७४ लाखांना लुबाडले
वापरात असलेला टू बीएचके फ्लॅट देण्याच्या बहाण्याने २५ लाख ७४ हजार रुपये घेतल्यानंतर ना फ्लॅट दिला, ना रक्कम परत केली, अशी तक्रार नवेवाडे येथील रहिवासी फुर्तादो यांनी वास्को पोलीस स्थानकात दाखल केली आहे. या तक्रारीवरून चिखली येथील रिचर्ड आणि राजेश्वरी यांच्याविरोधात वास्को पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
गुरुवार

कार्तिक कुडणेकर यांचे निधन
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष, खापरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते कार्तिक कुडणेकर (४६) यांचे अल्प आजाराने गोमेकॉत आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सुकूर येथील स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कार्तिक कुडणेकर हे हल्लीच आजारी पडले होते. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू होते. गुरुवारी पहाटे उपचारावेळी त्यांचे निधन झाले.
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
कोल्ड्रिंक घेण्याच्या बहाण्याने आलेल्या चोराने दुकानदार महिलेल्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावू्न पळ काढला. पीडीए कॉलनी पर्वरी येथे ही घटना घडली. साळगाव पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे.

चिरेवाहू ट्रकची दोन कारला धडक
मायना कुचेली म्हापसा येथे चिरेवाहू ट्रकने दोन कारला धडक देत घराची संरक्षक भिंत तोडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.
कारने धक्का दिल्याने सात दुचाकींचे नुकसान
म्हापसा कोर्टाजवळ एका कारने धक्का दिल्यामुळे सात दुचाकींचे नुकसान झाले. यात जखमी झालेल्या एका दुचाकी चालकाला जिल्हा इस्पितळात दाखल केले.
शुक्रवार
बर्च दुर्घटना : सरकारी खाती, अधिकाऱ्यांवर ताशेरे
‘बर्च बाय रोमिओ लेन’ या क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने डझनभर सरकारी खात्यांवर तसेच अनेक अधिकाऱ्यांवर गंभीर ताशेरे ओढले. आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि जागेची प्रत्यक्ष पाहणी न करताच विविध खात्यांनी या क्लबला परवाने दिल्याचे अहवालात स्पष्ट झाले.
जावई-सासूच्या खूनप्रकरणी दोघा युवकांना जन्मठेप
फातोर्डा येथील मिंगेल मिरांडा आणि त्यांच्या सासूबाईंच्या खून प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी रविनकुमार सडा आणि आकाश घोष या दोघांना खुनाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
डिचोलीत महिलेचा संशयास्पद मृत्यू
डिचोली तालुक्यातील बंदरवाडा परिसरात, बसस्थानकाच्या मागील बाजूस एका इमारतीखाली पार्क करून ठेवलेल्या उघड्या जीपमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या नाकावर जखम असल्याने तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शनिवार
घरफोडी करणारे गजाआड
पेडणे पोलीस स्थानकाच्या हद्दीत गेले सहा महिने घरफोडी करणाऱ्या चोरांना पोलिसांनी गजाआड केले आहे. पेडणे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
लक्षवेधी
डिचोली येथील संकल्प इमारतीजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी पोलीस असल्याचे भासवून एका महिलेचे सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली आहे.
बार्देश तालुक्यातील एका सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला होता. या प्रकरणातील संशयित अल्लाबक्ष सय्यदाबादे उर्फ बक्षी (४६) याला अटक झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. संशयिताच्या कुटुंबाला गावात राहण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर, स्थानिक पंचायतीने ‘२० कलमी कार्यक्रम’ परिसरातील या कुटुंबाला बुधवारी सात दिवसांच्या आत घर खाली करण्याची अधिकृत नोटीस बजावली आहे.
राय पंचायतीचे सचिव अमृत साखळकर (४२, वास्को) यांच्यावर एका २७ वर्षीय बिगर गोमंतकीय महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पणजी महिला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली.
जिल्हा पंचायत निवडणुकीत सासष्टीच्या मतदारसंघात गिर्दोली, दवर्ली, नावेली, नुवे, कुडतरी, वेळ्ळी आणि बाणावलीची जागा जिंकत काँग्रेस ‘धुरंधर’ असल्याचे दाखवले. गोवा फॉरवर्डने रायची जागा जिंकून राज्यात प्रथमच खाते खोलले. दवर्ली, गिर्दोली या जागा भाजपकडून गेल्या.